H3N2 Influenza Virus : भारतामध्ये इन्फ्लुएंझा व्हायरस एच3 एन2  या विषाणूने आपला प्रकोप दाखवण्यास सुरुवात केली आहे. या विषाणूमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक आणि हरियाणा या राज्यात प्रत्येकी एका एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, कर्नाटकमधील 82 वर्षीय हासन हा इन्फ्लुएंझा विषाणूमुळे मृत्यू पावणारा देशातील पहिला व्यक्ती आहे. त्याशिवाय हरियाणा येथेही एका व्यक्तीचा इन्फ्लुएंझामुळे मृत्यू झाला आहे. 


आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकमधील व्यक्तीला 24 फेब्रुवारी रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 1 मार्च रोजी त्याचं निधन झालं. त्या व्यक्तीचं डायबेटिस आणि हाय ब्लड प्रेशरचा आजार होता. 


मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात H3N2 या विषाणूचे 90 रुग्ण आढळले आहेत.  एच1एन1 या विषाणूचेही आठ रुग्ण आढळले आहेत. गेल्या महिन्यात देशभरात तापाच्या साथीत मोठ्या प्रमाणात वाढ जाल्याचं दिसले. यामध्ये बहुतांश रुग्ण  H3N2 या विषाणूने संक्रमित असल्याचं समोर आले. या विषाणूला 'हाँगकाँग फ्लू' या नावानेही ओळखलं जाते. हा विषाणू भारतामध्ये इतर इन्फ्लुएंझा सब व्हेरियंटच्या तुलनेत अधिक शक्तीशाली आहे. 


कोरोनासारखी लक्षणे 


भारतामध्ये आतापर्यंत फक्त H3N2 आणि H1N1 संक्रमित रुग्ण मिळाले होते. या दोन्ही विषाणूची लक्षणे कोरोना व्हायरससारखी आहेत. या विषाणूने जगभरात अनेकांना बाधित केले आहे. कोरोना महामारीला दोन वर्ष झाल्यानंतर पुन्हा एकदा प्लू च्या रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. 


H3N2 विषाणू संसर्गाची लक्षणं


ताप, खोकला आणि वाहणारं नाक तसेच शरीरदुखी, मळमळ, उलट्या किंवा जुलाब ही H3N2 विषाणूची काही प्रमुख लक्षणे आहेत.


H3N2 व्हायरसपासून संरक्षण कसं कराल?


H3N2 विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी म्हणून मास्क घालण्याचा, हात वारंवार धुण्याचा आणि सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं आहे की, या इन्फ्लूएंझापासून गंभीर आजाराचे रुग्ण आणि वृद्धांनी काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी लस घेणं आवश्यक आहे. तसेच, इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) या व्हायरसला हंगामी ताप म्हटलं आहे, हा विषाणू पाच ते सात दिवस टिकतो. IMA ने संक्रमित व्यक्तीला अँटीबायोटिक घेणं टाळण्याचा सल्ला दिला आहे.


फ्लूवरील वार्षिक लस घ्या.
हात नियमितपणे स्वच्छ धुवा. विशेषत: टायलेट नंतर, जेवणाआधी तसेच चेहरा किंवा नाकाला स्पर्श करण्याआधी हात साबणाने स्वच्छ धुवा.
शक्य असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा.
आजारी व्यक्तींपासून दूर राहा. 
H3N2 विषाणूवरील उपचार
H3N2 विषाणू असलेल्या मुलांवर आणि प्रौढांवर ओसेल्टामिविर, झानामिविर, पेरामिविर आणि बालोक्सावीर या औषधांनी उपचार केले जाऊ शकतात, मात्र यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. जर तुमच्या डॉक्टरांनी अँटीव्हायरल औषध लिहून दिलं, तर त्याचं सेवन डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच घेणं गरजेचं आहे.


आणखी वाचा :
H3N2 Virus : कोरोनासारखा पसरतो इन्फ्लुएंझा विषाणू, स्वत:चं संरक्षण कसं कराल? वाचा सविस्तर...