Dr. Randeep Guleria On H3N2 Influenza : सध्या कोरोना (Coronavirus) रुग्णांमध्ये घट झाली असली तरी नव्या विषाणूनं डोकं वर काढलं आहे. हवामान बदलामुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकला या समस्यांना तोंड द्यावं लागतंय. सर्दी आणि सततचा खोकला यावर औषधही काम करेनाशी झाली आहेत. औषधं घेतल्यानंतरही बहुतेकांना खोकल्यापासून पूर्णपणे आराम मिळालेला नाही. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नं हा नवा व्हायरस असल्याचं सांगितलं आहे. ICMR नं दिलेल्या माहितीनुसार, हे एका प्रकारच्या इन्फ्लूएंझा व्हायरसमुळे होत आहे. 


सर्दी-खोकला, ताप या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ


सध्या देशात इन्फ्लूएंझा A चा H3N2 व्हायरसचा संसर्ग वाढला आहे. H3N2 मुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. दरम्यान, मेदांताचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी नागरिकांना घाबरू नका असा सल्ला दिला आहे. डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं की, देशात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाला आहे. पण सर्दी-खोकला आणि ताप या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. अनेक राज्यांमध्ये इन्फ्लूएंझा A चा उपप्रकार H3N2 व्हायरसचा संसर्ग वाढला असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. H3N2 व्हायरसचा संसर्ग दरवर्षी या वेळी पाहायला मिळतो. 


H3N2 व्हायरस H1N1 चा म्युटेट स्ट्रेन


H3N2 व्हायरस हा H1N1 व्हायरसचा म्युटेट स्ट्रेन असल्याची माहिती डॉ. गुलेरिया यांनी दिली. त्यांनी सांगितलं की, "या व्हायरसमध्ये वेळेनुसार बदल होतो. कालांतराने हा विषाणू स्वरूप बदलतो. याला अँटीजेनिक ड्रिफ्ट म्हणतात. काही वर्षांपूर्वी H1N1 व्हायरसचा प्रसार झाला. H3N2 त्याचा बदलेला प्रकार आहे. हा एक सामान्य इन्फ्लूएंझा स्ट्रेन आहे. हा व्हायरस कोविड प्रमाणेच पसरतो. मात्र नागरिकांनी घाबरण्यातं कारण नाही. फक्त ज्यांना गंभीर आजार आहेत त्यांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे."


H3N2 विषाणू संसर्गाची लक्षणं


ताप, खोकला आणि वाहणारं नाक तसेच शरीरदुखी, मळमळ, उलट्या किंवा जुलाब ही H3N2 विषाणूची काही प्रमुख लक्षणे आहेत.


H3N2 व्हायरसपासून संरक्षण कसं कराल?


H3N2 विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी म्हणून मास्क घालण्याचा, हात वारंवार धुण्याचा आणि सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं आहे की, या इन्फ्लूएंझापासून गंभीर आजाराचे रुग्ण आणि वृद्धांनी काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी लस घेणं आवश्यक आहे. तसेच, इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) या व्हायरसला हंगामी ताप म्हटलं आहे, हा विषाणू पाच ते सात दिवस टिकतो. IMA ने संक्रमित व्यक्तीला अँटीबायोटिक घेणं टाळण्याचा सल्ला दिला आहे.



  • फ्लूवरील वार्षिक लस घ्या.

  • हात नियमितपणे स्वच्छ धुवा. विशेषत: टायलेट नंतर, जेवणाआधी तसेच चेहरा किंवा नाकाला स्पर्श करण्याआधी हात साबणाने स्वच्छ धुवा.

  • शक्या असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा.

  • आजारी व्यक्तींपासून दूर राहा. 


H3N2 विषाणूवरील उपचार


H3N2 विषाणू असलेल्या मुलांवर आणि प्रौढांवर ओसेल्टामिविर, झानामिविर, पेरामिविर आणि बालोक्सावीर या औषधांनी उपचार केले जाऊ शकतात, मात्र यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. जर तुमच्या डॉक्टरांनी अँटीव्हायरल औषध लिहून दिलं, तर त्याचं सेवन डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच घेणं गरजेचं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


H3N2 Symptoms 2023: बदलणाऱ्या वातावरणात वेगानं पसरतोय H3N2 व्हायरस; ताप अन् खोकल्यानं हैराण झालेयत लोक