ED Raid In Delhi: लँड फॉर जॉब घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं (ED) शुक्रवारी (10 मार्च) दिल्ली (Delhi), मुंबई (Mumbai) आणि पाटणा (Patna) येथे अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. लालू यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या मुलींच्या घरांसह दिल्लीतील 15 ठिकाणी ईडीच्या पथकानं छापे टाकल्याची माहिती आहे. यासोबतच ईडीचं पथक राजदचे माजी आमदार के अबू दोजाना (Abu Dojana) यांच्या पाटणा येथील घरीही पोहोचलं असून छापेमारी सुरु आहे. माजी आमदार अबू दोजाना हे बांधकाम व्यावसायिक आहेत. 


लँड फॉर जॉबच्या प्रकरणात लालू यादव यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. दोनच दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकाने लालू यादव यांची दिल्लीत चौकशी केली होती. दुसरीकडे, ईडीने शुक्रवारी दोन राज्यांमध्ये छापे टाकले आहेत. लालू यादव यांच्या तीन मुलींच्या घरांवरही छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. हेमा, रागिणी आणि चंदा यांचं घर दिल्लीत आहे, ज्यांच्या घरी ईडीकडून सध्या झाडाझडती सुरु आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीचं पथक बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या दिल्लीतील निवासस्थानीही पोहोचलं आहे.


लँड फॉर जॉब प्रकरण नेमकं काय? 


लँड फॉर जॉब हे प्रकरण 2004 ते 2009 दरम्यान रेल्वे मंत्री असताना लालू प्रसाद यांनी त्यांच्या कुटुंबाला जमीन भेट देऊन किंवा जमीन विकून कथित 'ग्रुप-डी'मधील नोकऱ्यांसदर्भात आहे. एफआयआरमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, 2004-2009 दरम्यान मुंबई, जबलपूर, कोलकाता, जयपूर आणि हाजीपूर येथे असलेल्या रेल्वेच्या विविध झोनमध्ये काही व्यक्तींना ग्रुप-डी पदांवर नियुक्त करण्यात आलं होतं. त्या बदल्यात त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी लालू यादव यांच्या नावावर जमीन आणि एके इन्फोसिस्टम प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी केली होती. त्यानंतर या कंपनीची मालकी लालू प्रसाद यांच्या कुटुंबियांनी घेतली होती.


लालू प्रसाद यांच्या कुटुंबियांनी पाटण्यातील 1,05,292 चौरस फूट जमीन पाच विक्री सौदे, दोन भेटवस्तूंच्या माध्यमातून लोकांकडून घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यासाठी विक्रेत्यांना रोख रक्कम देण्यास सांगण्यात आलं आहे. या जमिनीची किंमत सध्याच्या 'सर्कल रेट'नुसार 4.32 कोटी रुपये आहे. पण ही जमीन लालू प्रसाद यांच्या कुटुंबाला यापेक्षा खूपच कमी किमतीत विकली गेली आहे.