Gujarat Assembly Election 2022 : गुजरातचा निकाल अपेक्षितच, महाराष्ट्रातून पळवलेल्या प्रकल्पांचा विजयात मोठा वाटा : उद्धव ठाकरे
Gujarat Assembly Election 2022 : गुजरातमध्ये भाजपने पुन्हा एकदा आपली सत्ता राखली आहे. भाजपच्या या विजयाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाकरे शैलीत भाजपला शुभेच्छा दिल्या आहेत.
Gujarat Assembly Election 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujarat Assembly Election ) भाजपचा (Bjp) दणदणीत विजय झालाय. भाजपच्या या विजयाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. 'गुजरातमधील विजयाबद्दल मी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांचे खास अभिनंदन करतो. गुजरातचा विजय विक्रमी आणि ऐतिहासिक आहे,' अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपचे अभिनंदन केले आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी देखील या विजयाबद्दल भाजपचे अभिनंदन केले आहे.
गुजरातसह हिमाचल प्रदेश विधान सभा निवडणुकीचा देखील निकाल लागलाय. तेथे काँग्रेसचा दणदणीत विजय झालाय. तर काल झालेल्या मतमोजणीत दिल्ली 'मनपा'मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'ने भाजपवर मात करत सत्ता खेचून आणली आहे. काँग्रेस आणि आपच्या या विजयाबद्दलही उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
Gujarat Assembly Election 2022 : शुभेच्छांमधून टोला
उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा देताना भाजपला टोला देखील लगावला आहे. "गुजरातचा निकाल अपेक्षितच होता. गुजरात निवडणूक ही पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्याच नेतृत्वाखाली लढवण्यात आली. त्यामुळेच जनतेने भाजपला भरघोस मतदान केले. त्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत असे दिसते. पंतप्रधान मोदी हे 11 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात येत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते येथेही भरघोस घोषणा करतील. आपने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मतविभागणी करून भाजपचा फायदा घडवून आणला हे देखील स्पष्ट झाले आहे. असो, ज्याचे त्याचे राजकारण सोयीनुसार चालत असते, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावलाय.
Gujarat Assembly Election 2022 : देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या टोल्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय. "उद्धव ठाकरे यांच्या जवळ एक अस्त्र आहे ते म्हणजे टोमणे अस्त्र. उद्धव ठाकरे यांना आता उद्योग कळायला लागले, रिफायनरी प्रकल्प त्यांनी घालावले, " अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Gujarat Assembly Election 2022 : आदित्य ठाकरेंकडूनही शुभेच्छा
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेचा निकाल जाहीर झाला. आता महाराष्ट्रातील निवडणुका लावा, आता घाबरायची काय गरज आहे? मुंबईसह अनेक पालिकांच्या निवडणुका बाकी आहेत. एकदा लोकशाही पद्धतीने होवून जावू द्या. जे विजयी झाले त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी भाजपला शुभेच्छा दिल्या आहेत.
आदित्य ठाकरे म्हणाले, "आता वेळ आलीय ती राज्यातील निवडणुकांची. राज्यात एक घटनाबाह्य सरकार बसले आहे. 40 आमदार, 12 खासदारांच्या निवडणुका व्हायला हव्या होत्या. त्या अजून झालेल्या नाहीत. आता एवढा मोठा विजय प्राप्त झाल्यावर महाराष्ट्रातील निवडणुका घ्यायला काहीच हरकत नाही.
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावरून देखील आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. "महाराष्ट्राने अजून संयम पाळलेला आहे. त्यांच्यासारखे अजून काही केलेले नाही. पण संयमाचा अंत पाहू नका. दोन मंत्री बेळगावात जावून काय करणार होते? तिकडच्या मुख्यमंत्र्यांनी दम दिल्यावर आमचे मंत्री घाबरले. असं घाबरट सरकार असेल तर राज्याला हे सरकार कसं पुढे नेणार? त्यामुळे दोन्ही मुख्यमंत्र्यांनी मध्यममार्ग काढावा. जे चाललंय ते योग्य नाही. गुजरातने जसे प्रकल्प पळले तसे आमचे जिल्हे आणि गावे पळवण्याचा हा डाव आहे का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या