Army Recruitment : गेल्या दोन वर्षांपासून सैन्य भरती झालेली नाही. "2020 आणि 2021 मध्ये भारतीय सैन्यातील भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. परंतु, सैन्य भरती थांबवण्यात आलेली नाही, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी राज्यसभेत दिली आहे.  प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान  प्रश्नांना उत्तर देताना भट्ट यांनी ही माहिती दिली आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षात सैन्य भरती झाली नसल्याचे राज्यमंत्री भट्ट यांनी यावेळी सांगितले. 


गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोनाचे सावट आहे. भारतही या महामारीचा सामना करत आहे. त्यामुळे दोन वर्षांत सैन्यात भरती करण्यात आलेली नाही. सैन्य भरतीमध्ये देशभरातील तरूण मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सैन्य भरती पुढे ढकलण्यात आली आहे. या दोन वर्षांत हवाई दल आणि नौदलातील भरती प्रक्रिया ऑनलाइन झाली असून जवानांची भरती करण्यात आली असल्याची माहिती राज्यमंत्री भट्ट यांनी राज्यसभेत दिली आहे.


याबरोबरच सैन्य भरतीबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, कोरोना महामारीमुळे सैन्य भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. 2018-19 मध्ये 53,431 जवानांची भरती करण्यात आली होती. तर  2019-20 मध्ये 80,572 जवानांची भरती करण्यात आली होती. या शिवाय 2020-21 मध्ये 2,772 आणि  2021-22 मध्ये   5,547 जवानांची नौदलात भरती करण्यात आली आहे. तर  2020-21 मध्ये भारतीय हवाई दलात 8,423 जवानांची भरती करण्यात आली आहे. तर  2021-22 मध्ये  4,609 जवानांची हवाई दलात भरती करण्यात आली आहे.


महत्वाच्या बातम्या