Bihar Jail Rule Changed : बिहार सरकारने अटकेत असलेल्या कैद्यांच्या सुटकेचे नियम बदलले. तुरुंगासंबंधित नियमांत बदल केल्याच्या काही दिवसांनंतर बिहार सरकारने आज मोठ्या गुन्हेगारीतील 27 कैद्यांच्या सुटकेची अधिसूचना जारी केली. यात माजी खासदार आनंद मोहन सिंह यांचाही समावेश आहे. माजी खासदार आनंद मोहन सिंह यांना 1994 मध्ये गोपालगंजचे तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी जी कृष्णैय्या यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते, त्यांचीही आज तुरुंगातून सुटका होणार आहे.


गोपालगंजचे तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी जी कृष्णैय्या यांना बिहारमधील एका जमावाने ठार मारले होते. माजी खासदार आनंद मोहन सिंह यांनी या जमावाला कृष्णैय्या यांना मारण्यासाठी चिथावणी दिली होती. गुंडगिरीतून राजकारणाकडे वळलेल्या खासदाराला 2007 मध्ये बिहारमधील कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. पाटणा उच्च न्यायालयाने मात्र ती जन्मठेपेत बदलली आणि तोच आदेश सर्वोच्च न्यायालयाने 2012 मध्ये कायम ठेवला.


पण या महिन्याच्या सुरुवातीला, बिहार सरकारने सार्वजनिक सेवकांच्या हत्येमागील दोषींना तुरुंगवासाची शिक्षा माफ करण्यास मनाई करणारे कलम काढून टाकले. राज्याच्या कायदा विभागाने काढलेल्या अधिसूचनेत, नवे नियम हे फक्त 14 वर्षांची शिक्षा भोगलेल्या किंवा 20 वर्षांची माफीची शिक्षा भोगलेल्यांसाठीच आहेत, असे स्पष्ट केले.


"14 वर्षांची वास्तविक शिक्षा किंवा 20 वर्षांची शिक्षा माफीसह भोगलेल्या कैद्यांची सुटका करण्यात येईल" असे 20 एप्रिल रोजी बिहार राज्य शिक्षा माफी परिषदेच्या बैठकीत काढलेल्या अधिसूचनेत म्हटले गेले आहे.


नियमातील बदल दलितविरोधी : मायावती


बिहारमध्ये तुरुंग नियमांतील बदल आणि आनंद मोहन सिंह यांच्या सुटकेमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे, मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने (BSP) नियमातील बदलाला "दलितविरोधी" म्हणून संबोधले आहे.


"बिहारच्या नितीश सरकारने सुरु केलेल्या आनंद मोहनच्या सुटकेविरोधात संपूर्ण देशातून नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. आंध्र प्रदेशातील मेहबूबनगरमधील (आता तेलंगणातील) गरीब दलित कुटुंबातील अत्यंत प्रामाणिक IAS अधिकारी जी. कृष्णैय्या यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी दोषी असेलल्या आनंद मोहनच्या सुटकेच्या निर्णयावर दलितविरोधी सरकार म्हणून चर्चा होत आहे”, असे मायावती यांनी रविवारी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


आनंद मोहन सिंह यांच्या सुटकेमुळे दलित समाज संतप्त होईल, असे सांगून त्यांनी नितीश कुमार सरकारला निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे.






भाजपचाही नितीश कुमार यांच्यावर निशाणा


भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला. "गुन्हेगारी प्रवृत्तीकडे झुकणारा आणि तरीही सत्तेवर टिकून राहणारा नेता भारताचा चेहरा असू शकतो का?" असे मालवीय यांनी सोमवारी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.


बिहार तुरुंगाच्या नियमावलीतील बदलामुळे आनंद मोहन सिंह या राजपूत नेत्याचा फायदा होईल. आनंद मोहन सिंह यांचा त्यांच्या समाजातील मतदारांवर मोठा प्रभाव आहे.


गेल्या दोन वर्षांपासून राजपूत समाजातील अनेक राजकारणी सिंह यांच्या लवकरात लवकर सुटकेची मागणी करत होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही अनेक वेळा आपल्या माजी सहकाऱ्याच्या पाठिशी उभे असल्याचे संकेत दिले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Viral Video: पाकिस्तान लीजवर घेण्याचं पाकिस्तानी ब्लॅागरचं पंतप्रधान मोदींना आवाहन, भारतीय हद्दीतील काश्मीरही नशीबवान असल्याची भावना व्यक्त