Crime News: पश्चिम बंगालमधून (West Bengal) समोर आलेल्या एका घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. पश्चिम बंगालमधील बिजॉयगडमध्ये मानसिक आजारांनी ग्रासलेल्या वृद्ध महिला आपल्या 38 वर्षीय मुलीच्या मृतदेहासोबत गेल्या काही दिवसांपासून राहत असल्यातची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी याप्रकरणी वृद्ध महिलेला ताब्यात घेतलं असून महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका फूड डिलिव्हरी बॉय घराशेजारून जात असताना त्याला दुर्गंधी आली. त्यानंतर जादवपूर पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ प्रकरणाची दखल घेत घटनास्थळी धाव घेतली आणि घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी घरातील दृश्य पाहून पोलीसही चक्रावले.
पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला त्यावेळी त्यांना 68 वर्षांची एक वृद्ध महिला आपल्या 38 वर्षीय मुलीच्या मृतदेहाशेजारी बसून होती. दिपाली बसू असं वृद्ध महिलेचं नाव असून संचिता बसू असं मृत मुलीचं नाव आहे. मुलीचा मृत्यू नेमका कसा झाला? याबाबत पोलिसांना अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी वृद्ध महिलेला ताब्यात घेतलं असून याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मुलगी संचिता बसू हिचा मृत्यू नेमका झाला कसा? याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
दोन-तीन दिवसांपूर्वी मुलीचा मृत्यू झाल्याचा अंदाज
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिला आणि तिची मुलगी दोघीही मानसिक आजारांचा सामना करत होत्या. वृद्ध महिलेनं आपल्या मुलीच्या मृत्यूची माहिती कोणालाही दिली नव्हती. एक फूड डिलिव्हरी बॉय वृद्ध महिलेल्या घराशेजारून जात असताना त्याला घरातून दुर्गंधी आली. काहीतरी चुकीचं घडल्याचा संशय आल्यानं फूड डिलिव्हरी बॉयनं तात्काळ शेजाऱ्या पाजाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
मृतदेह पाहून मुलीचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्राथमिक तपासात असं समोर आलं की, आई-मुलगी दोघांकडे उत्पन्नाचं कोणतंही साधन नव्हतं, त्यामुळे त्यांचा एक नातेवाईक त्यांना जेवण पाठवत असे. आता संचिता बसूच्या मृत्यूचं कारण काय? तिचा मृत्यू कसा झाला? हे अद्याप समजलेलं नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
दरम्यान, 2015 साली असाच एक प्रकार उघडकीस आला होता. पार्थ डे हा सॉफ्टवेअर इंजिनिअर होता, तो त्याची बहीण देबजानी डे आणि दोन पाळीव कुत्र्यांच्या सांगाड्यासह सहा महिने घरात राहत होता. पार्थच्या वडिलांनी स्वतःला पेटवून घेतल्यानंतर या घटनेचा खुलासा झाला होता.