7th Pay Commission : येत्या काही महिन्यांत केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Government Employee) पुन्हा एकदा गुड न्यूज देण्याची शक्यता आहे. सरकारने अलीकडेच कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीए/डीआरमध्ये चार टक्क्यांनी वाढ केली होती. त्यातच आता असं समोर येत आहे की सरकार या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीसाठी महागाई भत्ता (Dearness Allowance) चार टक्क्यांनी वाढवू शकते. सरकारने जानेवारी ते जुलै 2023 च्या पहिल्या सहामाहीसाठी डीए आणि डीआरमध्ये चार टक्क्यांनी वाढ केली होती. आता जुलैमध्ये सरकार डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ करेल, अशी आशा कर्मचाऱ्यांना आहे. चार टक्के वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्क्यांवरुन 46 टक्के होईल.


वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता वाढतो


सरकार सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात दुसऱ्या सहामाहीसाठी डीए वाढवण्यास मान्यता देते. मात्र यावेळी ऑगस्टमध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) शिफारशींनुसार डीएमध्ये वर्षातून दोनदा वाढ होते. पहिल्या सहामाहीत डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. डीए हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेचा भाग आहे. महागाईचा दर पाहता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा डीए वाढवते.


पगारात किती वाढ होणार?


केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्के झाला तर त्यांच्या पगारातही वाढ होईल. समजा केंद्रीय कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18, 000 रुपये आहे. 42 टक्क्यांच्या हिशेबाने महागाई भत्ता 7560 रुपये होतो. दुसरीकडे, जर डीए दुसऱ्या सहामाहीत 46 टक्क्यांपर्यंत वाढला तर तो 8,280 रुपये होईल. म्हणजेच पगारात दरमहा 720 रुपयांची वाढ होणार आहे. सरकारने 2022 च्या दुसऱ्या सहामाहीत डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ केली होती. त्यामुळे यंदाही एवढी वाढ अपेक्षित आहे. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.


अशाप्रकारे महागाई भत्ता 42 टक्क्यांवर पोहोचला!


जुलै 2021 मध्ये दीर्घ कालावधीनंतर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 17 टक्क्यांवरुन 28 टक्के केला होता. यानंतर, ऑक्टोबर 2021 मध्ये, आणखी 3 टक्के वाढ देऊन तो 31 टक्के करण्यात आला. मग सरकारने मार्च 2022 मध्ये कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये तीन टक्क्यांनी वाढ केली होती. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 टक्क्यांवरुन 34 टक्के करण्यात आला आहे. यानंतर दोन वेळा डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि तो 42 टक्क्यांवर पोहोचला.


कशाच्या आधारावर महागाई भत्ता ठरवला जातो?


अखिल भारतीय CPI-IW च्या आकडेवारीनुसार कामगार ब्युरो, कामगार आणि रोजगार मंत्रालयाचा एक विभाग, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित करतो. कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सध्या 42 टक्के दराने डीए मिळत आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या आधारे महागाई भत्ता मिळतो. त्याचं कॅल्क्युलेशन सातव्या वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रिक्स वापरुन केली जाते.