G20 History: G20 परिषद कधीपासून आणि कोणत्या उद्देशाने सुरू झाली? जाणून घ्या, सर्व काही सविस्तर
G20 History: दिल्लीत दोन दिवसीय G-20 परिषद आयोजित करण्यात आली आहे, यामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक जागतिक नेते भारतात पोहोचले आहेत. पण नेमकी कधीपासून परिषद सुरू झाली? हे तुम्हाला माहीत आहे का?
![G20 History: G20 परिषद कधीपासून आणि कोणत्या उद्देशाने सुरू झाली? जाणून घ्या, सर्व काही सविस्तर G20 History when was the G20 conference started and for what purpose know everything about g20 here G20 History: G20 परिषद कधीपासून आणि कोणत्या उद्देशाने सुरू झाली? जाणून घ्या, सर्व काही सविस्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/09/7980d78ac614712f6dc4af0cdf1d64111694229313054713_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
G20 History: देशाची राजधानी दिल्ली G-20 परिषदेच्या (G-20 Summit 2023) यजमानपदासाठी सज्ज आहे. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्लीतील प्रगती मैदानाच्या भारत मंडपममध्ये या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्यासह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) G-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी शुक्रवारी (8 सप्टेंबर) दिल्लीत पोहोचले आहेत. दरम्यान, G-20 बाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. G-20 म्हणजे नक्की काय? G-20 ची सुरुवात कशी झाली आणि त्याची पहिली बैठक कुठे झाली? G-20 कशासाठी घेतली जाते? असे अनेक प्रश्न पडतात, तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात...
G20 म्हणजे काय?
G20 हा 20 देशांचा समूह आहे. या देशांचे प्रतिनिधी एकत्र येऊन जगातील आर्थिक आणि राजकीय प्रश्नांवर चर्चा करतात. G20 देशांचा जागतिक आर्थिक उत्पादनात 85 टक्के आणि जागतिक व्यापारात 75 टक्के पेक्षा जास्त वाटा आहे.
G20 मध्ये कोणत्या देशांचा समावेश?
G20 हा जगातील 20 देशांनी मिळून बनवलेला एक शक्तिशाली गट आहे आणि याची स्थापना 1999 साली झाली. याची स्थापना मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या देशांनी एकत्र येऊन परस्पर सहकार्य करावे, यासाठी झाली. भारताबरोबरच चीन, अमेरिका, रशिया, जर्मनी, जपान, ब्रिटन, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, तुर्की, मेक्सिको, दक्षिण कोरिया, युरोपियन युनियन आणि अर्जेंटिना या देशांचा या गटात समावेश आहे.
G20 समिट बनवण्याचा उद्देश काय होता?
1999 च्या आधी काही वर्षांपासून आशिया खंडातील देश आर्थिक संकटाचा सामना करत होते, त्या पार्श्वभूमीवर जर्मनीमध्ये G8 देशांची बैठक झाली आणि त्यांनी G20 ची स्थापना झाली. यामध्ये मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या सर्व 20 देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँक गव्हर्नरना बोलावण्यात आले होते. जागतिक आर्थिक समस्यांवर परस्पर चर्चा करून तोडगा काढणं, हा या संघटनेचा उद्देश होता.
जगासाठी G20 चं महत्त्व काय?
G20 च्या ताकदीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, त्याच्या सदस्य देशांकडे एकत्रितपणे जगाच्या GDP च्या 80 टक्के, लोकसंख्येच्या 60 टक्के आणि जागतिक व्यापारात 75 टक्के वाटा आहे. अशा परिस्थितीत या परिषदेत घेतलेल्या निर्णयाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो.
G20 ची बैठक कुठे होणार हे कसं ठरतं?
सर्व 20 सदस्य देशांमध्ये दरवर्षी रोटेशनची एक प्रणाली आहे, ज्याद्वारे नवीन अध्यक्ष निवडला जातो. जो देश परिषदेचा अध्यक्ष होतो तो G20 बैठका आयोजित करण्याची जबाबदारी पार पाडतो. यंदा भारताने G20 चं अध्यक्षपद भूषवलं आहे, त्यामुळे नवी दिल्लीत ही बैठक होत आहे.
परिषदेत G20 चा भाग नसलेले किती देश आले?
G20 चा भाग नसलेल्या देशांनी देखील परिषदेसाठी आमंत्रित केलं जातं. भारताने नऊ देशांना G20 मध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केलं आहे, ज्यात बांगलादेश, इजिप्त, यूएई, नेदरलँड्स, मॉरिशस, नायजेरिया, ओमान, सिंगापूर आणि स्पेन या देशांचा समावेश आहे.
आतापर्यंत किती G20 बैठका झाल्या?
G20 च्या स्थापनेला 24 वर्षं झाली असली तरी दरवर्षी G20 ची बैठक व्हायलाच हवी, असं नाही. दोन दशकांहून अधिक काळात एकूण 17 वेळा G20 बैठका झाल्या आहेत. G20 परिषद आयोजित करण्याची ही 18वी वेळ आहे. सदस्य देशांचे अर्थमंत्री आणि सेंट्रल बँकेचे गव्हर्नर सभेदरम्यान आर्थिक मुद्द्यांवर चर्चा करतात.
G20 चा सामान्य जनतेला काय फायदा?
G20 बैठकीदरम्यान जगातील अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर आणि तिला प्रोत्साहन देण्यावर चर्चा होते. आर्थिक मजबुतीमुळे देशांमध्ये रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतात. इथे शिक्षण, अन्नधान्याच्या किमती नियंत्रित करणं, रोजगार अशा मुद्द्यांवर देखील चर्चा होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)