चेन्नईला मुसळधार पावसाने झोडपले; पुराचा इशारा
Chennai heavy rain and flood : मागील काही दिवसांपासून चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. चेन्नईत मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
chennai heavy rain and flood : चेन्नई शहर आणि उपनगरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. चेन्नईतील दोन तलावातून पाणी सोडण्यात येणार असून प्रशासनाने रविवारी पुराचा इशारा जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे चेन्नईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. चेन्नईसह तामिळनाडूतील पूरस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. पंतप्रधानांनी केंद्र सरकारकडून आवश्यक मदत पुरवणार असल्याचे म्हटले.
मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी मुख्य सचिव व्ही. इराई अंबू यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाणी साचलेल्या ठिकाणांची पाहणी केली. साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री स्टालिन यांनी दिले. कॅबिनेट मंत्र्यासह स्टालिन यांनी पूराने प्रभावित झालेल्या नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या निवाऱ्याच्या ठिकाणी तांदूळ, दूध, चादर आदी मदत वितरीत केली.
आरोग्य मंत्री सुब्रमण्यम यांनी सांगितले की, चेन्नईमध्ये शनिवार रात्रीपासून 12 तासांमध्ये 20 सेमी इतका पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, चेन्नई आणि उपनगरात 10 सेमी ते 23 सेमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. तामिळनाडू सचिवालयाजवळील कामराजार सलाइ बिंदू (मरिना बीचजवळील डीजीपी कार्यालय) येथे सर्वाधिक 23 सेमी आणि उत्तर चेन्नईच्या उपनगरातील एन्नोरमध्ये 10 सेमी पावसाची नोंद करण्यात आली.
हवामान विभागाने रविवारी तामिळनाडू आणि पाँडिचेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देत 'रेड अलर्ट' जारी केला आहे. तर, चेन्नई महापालिका आणि इतर प्रशासकीय यंत्रणांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
तामिळनाडू राज्य आपात्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने ट्वीट करून म्हटले की, पुंडी धरणात क्षमतेपेक्षा अधिक जलसाठा झाल्याने 3376 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. चेन्नई शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे चेंबरमबक्कम आणि पुझल जलाशयातील पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणांहून 500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.