श्रीहरिकोटा : भारताची महत्त्वाकांक्षी मोहिम चांद्रयान-3 (Chandrayaan 3) ही अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, विक्रम लँडरचा (Vikram Lander) वेग कमी करण्यात आला असून चंद्राच्या कक्षेच्या दिशेने लँडरचा प्रवास सुरु झाला आहे. तसेच आतापर्यंतची सर्व परिस्थिती ही व्यवस्थित असल्याचं देखील इस्रोने (ISRO) म्हटलं आहे. तसेच चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग करण्यापूर्वी त्याचा वेग कमी करणं हे आव्हानात्मक असल्याचं इस्रोकडून सांगण्यात आलं आहे. 


पुढील डिबुस्टिंगची प्रक्रिया 20 ऑगस्ट रोजी


विक्रम लँडर प्रोप्लशन मॉडेलपासून वेगळे झाल्यानंतर त्याचा वेग पहिल्यांदा यशस्वीरित्या कमी करण्यात आला आहे. दरम्यान या यानाने चंद्राच्या मूळ कक्षेमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने प्रवास सुरु केला आहे. तर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यासाठी विक्रम लँडरचा वेग पुन्हा एकदा कमी करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया रविवार (20 ऑगस्ट) रोजी करण्यात येणार आहे. 






चंद्राचं जवळून झालं दर्शन


दरम्यान चांद्रयान -3 ने शुक्रवार (18 ऑगस्ट) रोजी चंद्राचा जवळून फोटो पाठवला. यामुळे संपूर्ण जगाला पुन्हा एकदा चंद्राचं दर्शन झालं. त्यामुळे आता या यानाने हा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केल्यास त्याचे चंद्रावर यशस्वी लँडिंग आणखी सोपं होणार आहे. म्हणूनच इस्रोसाठी हा टप्पा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार असून या टप्प्यात इस्रोच्या शास्रज्ञांचा कस लागणार आहे. 


आतापर्यंत असा झाला चांद्रयानाचा प्रवास!


श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून 14 जुलै रोजी चांद्रयानाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. तर 6 ऑगस्ट रोजी चांद्रयान - 3 ने यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेमध्ये प्रवेश केला. गुरुवार (17 ऑगस्ट) रोजी प्रोप्लशन मॉडेल विक्रम लँडरपासून वेगळं करण्यात आलं होतं. एकूण 40 दिवसांचा टप्पा पूर्ण करुन 23 ऑगस्ट रोजी हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


प्रोप्लशन मॉडेलपासून विक्रम लँडर वेगळं झाल्यानंतर त्याचा वेग कमी करण्यात आला आहे. त्यानंतर चंद्राच्या अंतिम कक्षेत प्रवेश करण्यासाठी विक्रम लँडर तयार आहे. 3.84 लाख किलोमीटरचा प्रवास चांद्रयान -3 करणार आहे. यामध्ये विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांचा समावेश आहे. विक्रम लँडर हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यावर रोव्हर त्यामधून बाहेर येईल. त्यानंतर प्रज्ञान रोव्हर हे चंद्राच्या पृष्ठभागावर फिरणार आहे. 


हेही वाचा : 


Chandrayaan-3 : चांद्रयान-3 च्या कॅमेऱ्यात अवकाशातील अदभूत नजारा, विक्रम लँडरने पाठवला चंद्राचा व्हिडीओ