हिस्सार : हरियाणाची बॉक्सर स्वीटी बूराने दुबई इथं सुरु असलेल्या आशियाई चॅम्पियनशिप बॉक्सिंग स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं आहे. हे कांस्य पदक आपण शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना समर्पित करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महामारीच्या काळातही सहा महिन्यापासून आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा असं आवाहन केलंय.
स्वीटी बूराने आपल्या सोशल मीडियातून आपल्या विजयाची माहिती दिली. ती म्हणाली की, "दुबईमध्ये सुरु असलेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये मला कांस्य पदक मिळालं आहे. मी हे पदक शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना समर्पित करत आहे. गेली अनेक दिवस आंदोलन करणाऱ्या या शेतकऱ्यांचं ऐकावं आणि त्यावर विचार करावा असं मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करत आहे."
दुबई येथे आशियाई चॅम्पियनशिप बॉक्सिंग स्पर्धा सुरु आहे. त्यामध्ये 81 किलो वजन गटात हरयाणाच्या स्वीटू बूराला कझाकिस्तानच्या बॉक्सरकडून हार पत्करावी लागल्याने कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. तिने आपले हे पदक दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान शहीद झालेल्या शेतकऱ्यांना समर्पित केलं आहे.
शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी
स्वीटी बूराचे मुळ गाव हे हिस्सारमधील घिराय. तिचे वडील शेती करतात तर आई गृहिणी आहे. 28 वर्षीच्या या बॉक्सरने लहान वयातच बॉक्सिंगमध्ये आपल करियर करायचं असं ठरवलं होतं. आतापर्यंत तिने अनेक पदकं जिंकली आहेत. शेतकरी पार्श्वभूमी असल्याने स्वीटी बूराने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब-हरयाणातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चेच्या 11 फेऱ्या पूर्ण झाल्या असूनही अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही.
महत्वाच्या बातम्या :