परभणी : परभणीच्या पूर्णा तालुक्यातील महागाव येथील भारतीय वायुदलात कार्यरत असणारे 23 वर्षीय जवान जिजाभाऊ मोहिते कर्तव्यावर असताना शहीद झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्यावर काल रात्री त्यांचं मुळगाव महागाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिजाभाऊ मोहिते यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन महिन्यांची मुलगी असा परिवार आहे. 


परभणीच्या पूर्णा तालुक्यातील महागाव येथील जिजाभाऊ किशनराव मोहीते हे 23 वर्षीय जवान तीन ते चार वर्षांपूर्वी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भारतीय वायू दलामध्ये दाखल झाले होते. सध्या ते पंजाब राज्यातील पठाणकोट येथे कर्तव्यावर होते. कर्तव्य बजावत असताना 27 मे रोजी अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि शहीद झाले. 28 मे रोजी सायंकाळी पठाणकोट येथे वायुदलाच्या वतीने मानवंदना देत त्यांचे पार्थिव महागावकडे रवाना झाले. 29 मे रोजी रात्री सव्वाआठ वाजता त्यांचे पार्थिव त्यांच्या गावात पोहोचले. जिजाभाऊ मोहिते यांच्या जाण्यानं संपूर्ण महागावावर शोककळा पसरली आहे. रात्री साडेदहा वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.




शहीद जवान जिजाभाऊ यांच्या कुटुंबियांनी धार्मिक रितीनूसार अंत्यविधी पूर्ण केला. तत्पूर्वी पोलीस दलाच्या तुकडीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. तसेच हवाई दलाच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. यावेळी बँड पथकांने शोकधून वाजवली. तिरंग्यामधील शहीद जिजाभाऊंचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. जिजाभाऊ मोहिते यांच्या जाण्यानं संपूर्ण महागावावरच शोककळा पसरील. साश्रुनयनांनी वीर जवान जिजाभाऊ मोहिते यांना अखेरचा निरोप देण्यात आला. शनिवारी रात्री साडेदहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.