नवी दिल्ली : महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू आणि गोवा या राज्यांतील कोविड-19 चा प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन किंवा इतर निर्बंध पुढील पंधरादिवसांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर दिल्ली, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत निर्बंधांमध्ये थोडी शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रात लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला
महाराष्ट्रात 1 जूननंतरही लॉकडाऊन वाढवला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिले. राज्यातील 21 जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट अजूनही 10 टक्क्यांवर आहे. त्यामुळे सध्या कोणतीही शिथिलता दिली जाणार नाही. राज्यात 1 जूननंतरही निर्बंध कायम ठेवले जातील. त्याबाबत मंत्रिमंडळाचं एकमत झालं असल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. लॉकडाऊन कायम राहणार असला तरी त्यात काही शिथिलता देण्यात येणार आहे. सरसकट लॉकडाऊन उठवला जाणार नाही.
काही जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात वाढत असलेली रुग्णसंख्या बघता आता असलेले निर्बंध तसेच ठेवावे असे मत आरोग्य विभागाने मांडले होते. पण काही विभागांनी निर्बंध शिथिल करावे अशीही भूमिका मांडली आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हाबंदी ही 10 जून नंतरच उठण्याची शक्यता आहे. दरम्यान 1 जूनपासून शासकीय आणि खासगी कार्यालय 50 टक्के क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकात काय स्थिती?
दरम्यान केरळमध्ये मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राज्यात 9 जूनपर्यंत निर्बंध वाढवण्याची घोषणा केली तर पुडुचेरी सरकारने केंद्र शासित प्रदेशात लॉकडाऊन 7 जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूने यापूर्वीच लॉकडाऊन 7 जूनपर्यंत वाढविला आहे. तर कर्नाटकात लोकांनी सहकार्य केलं आणि जर कोरोनाच्या आकडेवारीत घट झाली तर लॉकडाऊन वाढविण्याचा प्रश्न उद्भवत नाही असं वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केलं आहे. कर्नाटक सरकारने 7 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीत लॉकडाऊनमध्ये शिथिलता?
दिल्लीतील लॉकडाऊन उद्या 31 मे सकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. दिल्ली सरकारने उद्यापासून लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण लॉकडाउनचे निर्बंध 7 जूनपर्यंत लागू राहणार. डीडीएमएने विद्यमान लॉकडाऊन एका आठवड्यात वाढविला आहे. लॉकडाऊन दरम्यान कामगारांना बांधकाम साईटवर जाण्याची परवानगी दिली जाईल परंतू त्यांना प्रवासासाठी ई-पास घ्यावे लागतील.
मध्य प्रदेशात लॉकडाऊन 7 जूनपर्यंत वाढवला
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, 1 जूनपासून राज्यात 'कोरोना कर्फ्यू'वरील निर्बंधात थोड्या प्रमाणात शिथिलता देण्यात येईल, पण पुढच्या आठवड्यापर्यंत लॉकडाउन संपूर्ण राज्यात लागू राहील. त्याचबरोबर हिमाचल प्रदेश सरकारने शुक्रवारी लॉकडाऊन 7 जूनपर्यंत वाढवण्याची घोषणा केली.
ईशान्येकडील राज्यांत लॉकडाऊनमध्ये वाढ
ईशान्येकडील अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली आहे. नागालँडमध्ये 11 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये जूनपर्यंत सात जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन असेल. त्याचबरोबर मणिपूर सरकारने 11 जूनपर्यंत सात जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मिझोरमची राजधानी आईजोल कॉर्पोरेट क्षेत्रातही 6 जूनपर्यंत निर्बंध वाढवण्यात आले आहेत. पूर्व खासी हिल्स जिल्ह्यात मेघालय सरकारने संपूर्ण लॉकडाऊन एका आठवड्यासाठी वाढविला आहे.