Farmers Protest | शेतकरी आज 'सद्भावना दिवस' साजरा करणार, दिवसभर उपवास करणार
नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारे शेतकरी आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी सद्भावना दिवस म्हणून साजरी करणार आहेत. आंदोलक सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उपवास करतील.
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारे शेतकरी आज (30 जानेवारी) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपवास करणार आहेत. आंदोलक महात्मा गांधी यांची पुण्यतिथी सद्भावना दिवस म्हणून साजरी करणार आहेत. सिंघु सीमेवर शुक्रवारी (29 जानेवारी) संध्याकाळी आयोजित पत्रकार परिषदेत शेतकरी नेत्यांनी याची घोषणा केली.
किसान एकता मोर्चाच्या नेत्यांनी म्हटलं की, "आम्ही देशवासियांना आवाहन करतो की त्यांनी 30 जानेवारीला आमच्या उपोषणात सहभागी व्हावं. 30 जानेवारी हा दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. आमचे सर्व नेते, आंदोलक सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उपवास करतील."
यावेळी शेतकरी नेते युद्धवीर सिंह यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, "भाजपने आम्हाला तिरंग्याच्या सन्मानाबाबत लेक्चर देऊ नये. बहुतांश शेतकऱ्यांची मुलं सीमेवर देशाच्या रक्षणासाठी पहारा देत आहेत."
तर शेतकरी नेते दर्शनपाल सिंह यांनी सिंघु सीमेवर इंटरनेट सेवा बहाल करण्याची मागणी केली आहे. सिंघु बॉर्डरवरील पत्रकार परिषदेत शेतकरी नेत्यांनी केंद्र सरकार आणि सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. दर्शनपाल सिंह म्हणाले की, "इंटरनेट सेवा पूर्ववत करावी अशी आमची मागणी आहे. आमचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचू नये यासाठी इंटरनेट सेवा बंद केली आहे."
"आज पोलिसांनी हिंसेसाठी भाजप आणि आरएसएसच्या लोकांना पाठवलं आहे. इथे लोकांची संख्या वाढत आहे. गाझीपूरनंतर सिंघु, टिकरी, शाहजहांपूर प्रत्येक ठिकाणी लोक येत आहेत. सरकार याला हिंदू आणि शिख असा मुद्दा बनवत आहे. भाजपच्या लोकांना इथे विरोध करण्यासाठी पाठवलं आहे, पण आम्ही शांत राहणार," असंही दर्शनपाल यांनी शुक्रवारी झालेल्या घटनेचा उल्लेख करताना म्हटलं.