नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान दिल्लीत झालेल्या हिंसाचाराची दखल आता ट्विटरनेही घेतली आहे. या प्रकरणी बुधवारी ट्विटरने जवळपास 550 हून जास्त अकाउंटवर बंदी आणली आहे. हे सर्व अकाउंट दिल्लीतील हिंसाचाराशी संबंधित असल्याचं ट्विटरने स्पष्ट केलंय.
ट्विटरच्या 'सिंथेटिक अॅन्ड मॅनिप्यूलेटेड मीडिया पॉलिसी' च्या नियमांचे उल्लंघन केल्याने या सर्व अकाउंटवर बंदी घातल्याचं स्पष्टीकरण ट्विटरकडून देण्यात आलंय. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला प्रवृत्त करणे आणि ट्विटरच्या नियमाचे पालन न करणे यामुळेच संबंधित अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे.
दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर तंत्रज्ञान आणि मानवी पुनरावलोकनाच्या पद्धतीचा वापर करुन ट्विटरने मोठ्या प्रमाणात काम केलं. त्यानंतर ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन करणारी शेकडो खाती तसेच स्पॅम खाती अशा जवळपास 550 हून अधिक खात्यावर बंदी आणल्याची माहिती ट्विटरच्या प्रवक्त्याने दिली.
Farmer Tractor Rally Violence : दिल्ली हिंसाचारप्रकरणी योगेंद्र यादव यांच्यासह 26 जणांवर गुन्हे दाखल
ट्विटरकडून परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करण्यात येत आहे आणि त्यासंबंधी अधिक जागरुकतेने काम करण्यात येत आहे, जर अशा पद्धतीने कोणी नियमांचे उल्लंघन करत असेल तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल असे ट्विटरच्या प्रवक्त्याने एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले
दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या ट्रक्टर परेडला परवानगी देण्यात आली होती. पण नियोजित मार्गाचा वापर न करता काही आंदोलकांनी बॅरिकेट्स तोडले आणि ते दिल्लीच्या इतर भागात घुसले. त्यानंतर दिल्लीमध्ये मोठा हिंसाचार उफाळला. काही आंदोलकांनी दिल्लीच्या लाल किल्यावर जाऊन शीख समाजाचा ध्वज फडकावला. या दरम्यान सार्वजनिक मालमत्तेच मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले. तसेच 300 हून जास्त पोलीस यामध्ये जखमी झाले आहेत.
या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एकूण 22 गुन्हे दाखल केले असून या हिंसाचाराचा तपास आता दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रॅन्चच्या विशेष तपास पथकाकडे देण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये योगेंद्र यादव यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांच्याशिवाय राकेश टिकैत, सरवनसिंग पंढेर आणि सतनामसिंग पन्नू यांचीही नावं एफआयआरमध्ये नाव आहे. या नेत्यांव्यतिरिक्त पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू आणि लखबीरसिंग उर्फ लखा सिधाना हे देखील दिल्ली पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 26 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
गेल्या 60 दिवसांपासून पंजाब-हरयाणाचे शेतकरी केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेच्या बऱ्याच फेऱ्या पार पडल्या असून त्यामधून कोणताही निष्कर्ष निघाला नाही.