नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान दिल्लीत झालेल्या हिंसाचाराची चौकशी आता दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रॅन्चकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी क्राईम ब्रॅन्चची एसआयटीची स्थापना करण्यात येणार आहे. मंगळवारी दिल्लीत झालेल्या हिंसाचारात 300 पेक्षा जास्त पोलीस जखमी झाले आहेत.


दिल्लीतील हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 22 एफआयआर दाखल केले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने हे प्रकरण आता गंभीर बनलं आहे. त्यामुळे आता दिल्ली पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.


Farmers Protest | लाल किल्ल्यावर फडकवलेला ध्वज नेमका कोणता? निशान साहिबबद्दल सर्वकाही


मंगळवारी संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या संबंधी एक बैठक बोलावली होती. काल संध्याकाळपर्यंत दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणी केवळ चार एफआयआर दाखल करण्यात आले होते. आता त्याची संख्या 22 इतकी झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने लाल किल्ल्यावरती आंदोलकांनी चढाई करत शिख धर्मियांचा निशान साहिब हा ध्वज फडकावला होता. या प्रकरणाची गंभीर दखल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतल्याचं सांगण्यात येतंय.


या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेता आता दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रॅन्चकडे हा तपास जाणार आहे. क्राईम ब्रॅन्चची विशेष तपास टीम या प्रकरणाचा तपास करणार आहे. आता दिवसभर या संबंधी कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारकडून या हिंसाचार प्रकरणी कोणतंही अधिकृत वक्तव्य वा निवेदन आलं नाही.


Farmers Protest | 'हे शेतकरी आंदोलन, धार्मिक आंदोलन नाही' ; शेतकरी नेते गुरनाम सिंह दीप सिद्धूवर संतापले


आपल्या मागण्यांसाठी येत्या एक फेब्रुवारीला संसदेवरती धडक देण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. त्यासंबंधी शेतकरी नेत्यांच्या बैठका सुरु आहेत. दिल्लीत काल झालेल्या हिंसाचाराचा ठपका तिघांवरती ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये पंजाबी गायक दीप सिध्दू आणि कबड्डीपट्टू लख्खा सिधाना याचा समावेश आहे.


 राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान, लाल किल्यावर झालेल्या हिंसेनंतर भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन राकेश टिकैत शेतकऱ्यांना भडकवत असल्याचा आरोप होत आहे.


ट्रॅक्टर रॅली दरम्यान आंदोलक शेतकऱ्यांनी अनेक अटींचं यावेळी उल्लघन केल्याचं सांगण्यात येतंय. शस्त्रे न बाळगता, निर्धारित मार्गाचा अवलंब करून आणि ट्रॉलीविना ट्रॅक्टरसह दिल्लीत प्रवेश करणे अशा काही अटींवर शेतकरी नेते आणि पोलीस यांच्यात सहमती झाली होती. मात्र मंगळवारी ट्रॅक्टरच्या परेडमध्ये सहभागी असलेल्या अनेक निदर्शकांनी नियमांचं उल्लंघन केलं. पाच पेक्षा जास्त लोक ट्रॅक्टरवर बसणार नाहीत, या अटीचंही उल्लंघन आंदोलक शेतकऱ्यांनी केलं. त्यामुळे हा ट्रॅक्टर मार्च हिंसक झाला आणि यावेळी अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली.


Farmers Protest | बळाचा वापर करुन आंदोलन चिरडल्यास गंभीर परिणाम : शरद पवार