Corona Vaccination : काही दिवसांपूर्वी छत्तीसगड सरकारने कोरोना लस घेणाऱ्यांना दिलेल्या प्रमाणपत्रात पंतप्रधानांऐवजी राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा फोटो वापरल्याने राजकीय गदारोळ झाला होता. आता पश्चिम बंगाल सरकार त्याच धर्तीवर राज्यात कोरोना प्रमाणपत्र देताना पंतप्रधान मोदींच्या ऐवजी ममता बॅनर्जी यांचा फोटो लावलेला दिसत आहे.


राज्य सरकारने खरेदी केलली लस टोचल्यानंतर प्रत्येक प्रमाणपत्रावर यापुढे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे छायाचित्र येणार असल्याचे सांगितले जात आहे. याअगोदर कोविड प्रतिबंधक लस दिल्यानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो होता. मात्र, आता 18 ते 45 वर्ष वयोगटातील नागरिकांच्या प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो दिसणार आहे.




कोलकाता येथील क्वेस्ट मॉल येथे राज्य सरकारने ड्राइव्ह-ई लसीकरण सुरू केले आहे. राज्य सरकारचे मंत्री फिरहाद हकीम म्हणाले, की आम्ही राज्यात दररोज 3 लाख लोकांचे लसीकरण करीत असून हे प्रमाण अधिक वाढवणार आहे.


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी सांगितले की, डिसेंबर 2021 पूर्वी देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण करणार असल्याचं केंद्राचं वक्तव्य खोटं आहे. ते फक्त निराधार गोष्टी बोलत आहेत. मुख्यमंत्री बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, केंद्र सरकार राज्यांना लस पुरवठा करत नाही. केंद्राने राज्यांसाठी लस विकत घ्यावी आणि सर्वांना ती विनामूल्य द्यावी. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारमध्ये विविध कारणांवरुन वाद सुरु आहे. अशा परिस्थितीत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो लावल्याने वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. बंगाल सरकारच्या या कृतीवर अद्याप तरी केेंद्र किंवा भाजपकडून कोणतेही उत्तर आलेले नाही.


दुसरीकडे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केंद्राकडूनच लस खरेदीबाबत संमती मागितली आहे. पटनायक म्हणाले की, त्यांनी काही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांच्यासमोर आपले विचार मांडले. कोरोना लसीकरणासाठी जोपर्यंत राज्य युद्धपातळीवर काम करत नाही. तोपर्यंत कोणतही राज्य सुरक्षित नसल्याचे ते म्हणाले.