गावात वीज पोहोचण्याआधी पोहोचलं वीजबिल
उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. 60 कुटुंबाना वीज पोहोचण्याआधी वीजबिल पाठवण्यात आलं आहे.

कुशीनगर : भारत सरकारने सामान्य नागरिकांना वीज पुरवठा करण्यासाठी सौभाग्य योजनेअंतर्गत वीज कनेक्शन देण्यास सुरूवात केली आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबाना मोफत वीज पुरवठा केला जातो. मात्र या योजनेत उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा समोर आला आहे.
कुशीनगरमधील 60 कुटुंबाना कागदोपत्री वीजपुरवठा मंजूर करण्यात आला आहे. वीज कनेक्शन अद्याप या कुटुंबीयांना देण्यात आलेलं नाही, मात्र वीज पोहोचण्याआधीच या कुटुंबांना वीजबिल पाठवण्यात आलं आहे. घटना समोर आल्यानंतर आता अधिकाऱ्यांनी चौकशीचं आश्वासन दिलं आहे.
कुशीनगरच्या जनपदच्या तमकुही विकास खंडमधील पखिहवा गावातील हा प्रकार आहे. वीज विभागाच्या कॅम्पमधील 60 कुटुंबांना वीज कनेक्शन मंजूर झालं आहे. मात्र अद्याप या कुटुंबीयांना वीज देण्यात आलेली नाही. गावात वीजेचे खांब उभे करण्यात आले आहेत. मात्र त्यावर वीजेच्या तारा जोडणीचं काम बाकी आहे.

गावात अद्याप वीज नाही मात्र तीन महिन्याचं 955 रुपये बिल या गरीब कुटुंबांना आलं आहे. वीज विभागाकडून आलेलं बिल पाहून गावकऱ्यांना धक्का बसला आहे. वीज विभागाकडून झालेल्या चुकीची लवकरच सुधारणा केली जाईल, असं जिल्हाधिकारी अनिल कुमार सिंह यांनी सांगितलं आहे. तसेच गावात लवकरात लवकर वीज पोहोचेल असं आश्वासनही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं आहे.
Before You Go
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली






















