असं पहिल्यांदाच घडलं! पाच राज्यांच्या निवडणुकीदरम्यान विक्रमी मुद्देमाल जप्त, निवडणूक आयोगाची माहिती
ELECTION COMMISSION OF INDIA : कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूमध्ये आतापर्यंत 1 हजार कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे. निवडणूक आयोगाने सांगितलं की, आतापर्यंत पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकांमधील सर्वात मोठी कारवाई आहे.
मुंबई : देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपैकी चार राज्यांची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. तर पश्चिम बंगालमधील चार टप्प्यातील निवडणुका अजून बाकी आहेत. या दरम्यान कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूमध्ये आतापर्यंत 1 हजार कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे. निवडणूक आयोगाने सांगितलं की, आतापर्यंत पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकांमधील सर्वात मोठी कारवाई आहे.
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या प्रेसनोटनुसार पाचही विधानसभा निवडणूक होत असलेल्या राज्यात रोख रक्कम आणि अन्य आमिष मिळून एक हजार कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आजवरच्या निवडणुकांमध्ये हा रेकॉर्ड आहे. तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 236 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगानं म्हटलं आहे की, कडक नियम आणि कडेकोट तपासणीमुळं एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करणं शक्य झालं आहे.
कोणत्या राज्यात किती कारवाई झाली याबाबत जाणून घेऊयात...
आसाम
आसाममध्ये एकूण 122 कोटी 35 लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये 27 कोटी 9 हजारांची रोकड तर 41 कोटी 97 लाखांची दारु तर 34.41 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. तर 15 कोटी 18 लाखांच्या भेटवस्तु आणि 3.69 कोटींच्या अन्य वस्तुंचा समावेश आहे. मागील विधानसभा निवडणुकीत 16 कोटी 58 लाखांची मालमत्ता जप्त केली होती.
पश्चिम बंगाल:
पश्चिम बंगालमधील निवडणुकीदरम्यान आतापर्यंत एकूण 300 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. त्यात 50 कोटी 71 लाखांची रोकड, 30 कोटी 11 लाखांची दारु, 118 कोटी 83 लाखांचं ड्रग्स जप्त केलं आहे. मागील विधानसभा निवडणुकीत बंगालमध्ये 44 कोटी 33 लाखांच्या जप्तीची कारवाई झाली होती.
तामिळनाडू:
तामिळनाडूमध्ये 446 कोटी 28 लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यात तब्बल 236 कोटी 69 लाखांची रोकड, 5 कोटी 27 लाखांची दारु, 2 कोटी 22 लाखांचे ड्रग्स जप्त केले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत 130 कोटी 99 लाखांची मालमत्ता जप्त केली होती.
पुद्दुचेरी :
पुद्दुचेरीमध्ये एकूण 36.95 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. यात 5 कोटी 52 लाखांची रोकड, 70 लाखांची दारु, 25 लाखांचे ड्रग्जचा समावेश आहे. मागील विधानसभा निवडणुकीत पुद्दुचेरी 7 कोटी 74 लाखांची मालमत्ता जप्त केली.
केरळ :
केरळमध्ये 84.91 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये 22 कोटी 88 लाखांची कॅश, 5 कोटी 16 लाखांची दारु आणि 4 कोटी 6 लाखांचे ड्रग्स जप्त केले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत केरळमध्ये एकूण 26 कोटी 13 लाखांची मालमत्ता जप्त केली होती.