Kumar Vishwas : आम आदमी पक्षाचे माजी नेते कुमार विश्वास यांनी केलेल्या कथित वक्तव्याचे प्रसारण थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कुमार विश्वास यांच्या वक्तव्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत असून सोशल मीडिया आणि टीव्ही चॅनेलवरील त्यांच्या वक्तव्याचे प्रसारण त्वरित थांबवण्यात यावे, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. 


निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, कुमार विश्वास यांनी केलेले वक्तव्य सध्या सोशल मीडिया आणि टीव्हीवर प्रसारीत होत आहे. परंतु, त्यांच्या वक्तव्यामुळे आदर्श आचारसंहितेचे  उल्लंघन होत आहे. कुमार विश्वास यांनी केलेले वक्तव्य प्रक्षोभक असून त्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने याबाबत आदेश दिले आहेत.  


कुमार विश्वास यांच्या या वक्तव्याचे व्हिडीओ राजकीय पक्षांनी प्रसारित करणे थांबवावे. शिवाय सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवरून ते व्हिडीओ हटवावेत, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.  


येत्या 20 फेब्रुवारी रोजी पंजाब विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. सर्वच पक्ष पंजाबमध्ये आपली सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आपल्या जाहीरनाम्यातून मतदारांना आकर्षीत करण्यासह एकमेकांवर आरोप-पत्यारोपही होत आहेत. हे सर्व सुरू असतानाच आपचे माजी नेते कवी कुमार विश्वास यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. कुमार विश्वास यांच्या या वक्तव्यानंतर आम आदमी पक्षाने त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. 


महत्वाच्या बातम्या