नवी दिल्ली : येत्या काही दिवसांमध्ये भारतात 2-3 लसींना मान्यता मिळेल असं वाटतं. लस आली तरी रोग दूर होईल असं नाही. रोग आपल्यासोबत राहीलच. त्यामुळे काळजी घेत राहणं आवश्यक असल्याचं मत CSIR चे महासंचालक डॉक्टर शेखर मांडे यांनी व्यक्त केलं आहे. एबीपी माझाशी बोलताना डॉ मांडे यांनी सांगितलं की, लसीकरणाच्या बाबतीत आपण मागे राहिलो आहे असे म्हणता येणार नाही. बाकी देशांमध्ये पण आत्ताच पंधरा दिवसांपूर्वी परवानग्या सुरू झाल्या आहेत.


डॉक्टर शेखर मांडे म्हणाले की, लसीमुळं कोरोनाचं पूर्णपणे निर्मूलन होईल का हे आपल्याला माहिती नाही. लसीमुळे देवीचा नाश करु शकलो तसं कोरोनाचं होईल का? हे अद्याप सांगता येत नाही, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, इंग्लंडमध्ये नवे म्यूटेशन आलं आहे. त्याचे सतरा म्यूटेशन झाले आहेत. वैज्ञानिक दृष्ट्या त्यावर काम केल्यानंतरच ते किती प्रभावी आहे हे समजेल. पण आता तरी त्या म्यूटेशनवर लस परिणामकारक असेल असं वाटतं, असं ते म्हणाले.


Dry Run : कोरोना लसीच्या ड्राय रनला सुरुवात, राज्यात 'या' ठिकाणी सुरुय लसीकरणाची रंगीत तालिम


शेखर मांडे म्हणाले की, म्यूटेशन येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येकच व्हायरसच्या बाबतीत होतं. इतक्या वेगात लस येणे हा आपल्या वैज्ञानिक प्रगतीचा ठाम पुरावा आहे, असंही ते म्हणाले.


डॉक्टर मांडे म्हणाले की, 30 जानेवारीला आपल्या भारतात पहिली केस सापडली आणि त्यानंतर इतक्या वेगात लस येत आहे. गेल्या वर्षभरात आपण जिनोम तयार केले. व्हेंटिलेटर तयार केले. स्वस्त टेस्टिंग किट, इमर्जन्सी हॉस्पिटल्स तयार केले आहेत, असंही ते म्हणाले. डॉ. मांडे म्हणाले की, सर्व लसी पहिल्या टप्प्यातून बाहेर आल्या आहेत. त्यात लसीच्या सुरक्षेबद्दल कडक चाचणी होत असते. त्यामुळे सामान्यांनी कुठलीही भीती बाळगू नये, असं शेखर मांडे म्हणाले.


सीरमच्या 'कोविशील्ड' लसीला आपत्कालीन वापराला मंजुरी 


सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. वॅक्सिन एक्सपर्ट पॅनेलने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (डीसीजीआय) मान्यता देण्याची शिफारस केली आहे. ब्रिटन आणि अर्जेंटिनानंतर ऑक्सफोर्ड लसीला मान्यता देणारा भारत तिसरा देश आहे. अॅस्ट्रोजेनिकाच्या संयुक्त विद्यमाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया 'कोविशिल्ट' लस तयार करत आहे. ऑक्सफोर्डच्या वतीने ही लस तयार केली जात आहे. तर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) सहकार्याने भारत बायोटेकने 'कोवॅक्सिन' तयार केली आहे, ज्याचे सादरीकरण बुधवारी पॅनेलसमोर करण्यात आले. फाईजरने आपला डेटा सादर करण्यासाठी अधिक वेळ द्यावा अशी मागणी केली. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासह भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड आणि फायजरने देखील आतपत्कालीन वापरासाठी मंजुरी मागितली आहे. सर्वात आधी 9 डिसेंबर रोजी कोरोना लसीसंदर्भात सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची बैठक झाली होती.