नवी दिल्ली : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी हिंदू आहे म्हणजे त्याला देशभक्त असायलाच हवे, असे वक्तव्य केल्यानंतर यावर एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पलटवार केला आहे. 'माझी देशभक्ती ही माझ्या धर्मातून आली आहे, असे महात्मा गांधी सांगायचे' अशा भागवत यांच्या वक्तव्यानंतर ओवैसींनी 'गोडसेंबद्दल आपला काय विचार आहे?' असा सवाल केला आहे.
काय म्हणाले होते मोहन भागवत
'मेकिंग ऑफ ए हिंदू पेट्रियॉट- बैकग्राउंड ऑफ गांधीजीज हिंद स्वराज' या पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भागवत म्हणाले की, देशभक्त ही संज्ञा मोजक्याच लोकांसाठी वापरायची, असे आम्ही कधीही मानत नाही. भारतात तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये या भूमीला पवित्र मानण्याची, आपले मानण्याची एक प्रवृत्ती आहे. भूमीच्या पावित्र्याची पूजा करण्याची प्रवृत्ती प्रत्येक भारतीयांमध्ये विविध रूपाने विद्यमान आहे. मात्र, महात्मा गांधीजी जे म्हणाले, ते विचार करण्यासारखे आहे. माझी देशभक्ती ही माझ्या धर्मातून आली आहे. त्यामुळे हिंदू आहे म्हणजे तो आपोआपच देशभक्तही आहेच, त्याला ते असायलाच हवे.अर्थात, त्याला झोपेतून जागे करावेच लागते. मात्र, भारतविरोधी अथवा भारतद्रोही असा कोणीही नसतो. त्यामुळे ‘हिंदू देशभक्त’ ही संज्ञा म्हणजे ‘वदतो व्याघात्’ असा प्रकार आहे, असे भागवत म्हणाले.
ओवैसी ट्वीट करत केला पलटवार
भागवत यांच्या या वक्तव्यानंतर खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, मग गोडसेबद्दल आपला काय विचार आहे? भागवत याचं उत्तर देतील का? गांधींजींचा हत्यारा गोडसेबाबत काय मत आहे? नेल्ली नरसंहारासाठी जबाबदार लोकांबाबत, 1984 च्या शीख विरोधी आणि 2002 गुजरात नरसंहार बाबत काय?'' असा सवाल ओवैसींनी केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, हे युक्तिसंगत आहे की, धर्मातील भेदभावाशिवाय अधिकतर भारतीय देशभक्त आहेत. ही फक्त आरएसएस संदर्भहिन विचारधारा असू शकते जी एका धर्माच्या लोकांना ऑटोमेटिकली देशभक्तीचं सर्टिफिकेट देत आहे. तर बाकी लोकांना आपलं जीवन देशभक्ती सिद्ध करण्यात घालवावं लागतंय.