Delhi Rain News: मुंबई-दिल्लीसह देशाच्या बहुतांश भागात पावसाला सुरुवात झाली असून नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. पण हाच पाऊस काहीजणांसाठी संकट ठरल्याचं स्पष्ट झालं. पावसामुळे नवी दिल्लीतही अनेक ठिकाणी पाणी साचले, त्या पाण्यात वीजेचा करंट उतरल्याने एका महिलेला आपला जीव गमवावा लागला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साक्षी अहुजा नावाची महिला शनिवारी रात्री तिच्या पतीसोबत ट्रेनने जाणार होती, त्यासाठी ती रेल्वे स्टेशनवर गेली. दिल्ली रेल्वे स्थानकात पावसामुळे विद्युत तारा साचलेल्या पाण्यात बुडाल्या होत्या. त्यामध्ये विद्युत प्रवाह चालू होता. या विजेचा धक्का लागून साक्षी अहुजाचा मृत्यू झाला.
काय प्रकरण आहे?
साक्षी आहुजा नावाची महिला पहाटे साडेपाच वाजता नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. तिच्यासोबत दोन महिला आणि तीन मुले होती. साक्षीला चंदीगडला जायचे होते. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे, त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पाण्यापासून वाचण्यासाठी त्या महिलेने विजेचा खांब पकडला. त्यामुळे महिलेला विजेचा धक्का बसला. त्यानंतर उपस्थित लोकांनीही महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता तिचा मृत्यू झाला.
गुन्हे पथक तपास करत आहे
पोलिसांनी सांगितलं की, साक्षी अहुजा नावाची महिला विजेचा करंट लागल्याने बेशुद्ध पडली होती, त्यानंतर लोकांनी तिला ताबडतोब एलएचएमसी हॉस्पिटलमध्ये नेले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृतदेह शवागारात ठेवण्यात आला. यानंतर साक्षीसोबतची तिची नातेवाईक असलेल्या माधवी चोप्रा या महिलेने संबंधित अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप करत तक्रार दिली. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी एसआय नसीब चौहान यांच्याकडे तपास सोपवला. क्राईम टीमने घटनास्थळाचे प्रत्येक कोनातून छायाचित्रण केले. एफएसएल, रोहिणीचे पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे.
62 वर्षांनंतर मुंबई आणि दिल्लीत एकाच दिवशी मान्सून
तब्बल 62 वर्षांनंतर मुंबई आणि दिल्लीत एकाच दिवशी मान्सून दाखल झाला आहे. यापूर्वी मान्सून मुंबई आणि दिल्लीत 21 जून 1961 रोजी दाखल झाला होता. त्यानंतर आज मुंबई आणि दिल्लीत मान्सून सक्रिय झाल्याची घोषणा हवामान विभागानं केली आहे. मुंबईत मान्सून दाखल होण्याची संभाव्य तारीख 11 जून तर दिल्लीत दाखल होण्याची संभाव्य तारीख 27 जून आहे.
ही बातमी वाचा: