Kolhapur Crime: कोल्हापुरातील उद्योजक संतोष शिंदे यांच्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेली माजी नगरसेविका आणि पोलिस अधिकाऱ्याला बेड्या घातल्या आहेत. कोल्हापूर पोलिसांच्या टीमने दोघांना सोलापुरातून ताब्यात घेतलं. माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि राहुल राऊत पोलिसांच्या ताब्यात असून ते सोलापूरच्या एका हॉटेलमध्ये लपून बसले होते.
एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि आणि पोलिस अधिकारी राहुल राऊत यांनी त्रास दिल्याचं सांगत कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमधील उद्योजक संतोष शिंदे यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलासह आत्महत्या केली होती. या प्रकरणात लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि पोलिस अधिकारी राहुल राऊत यांना जबाबदार धरलं होतं.
संतोष पाटील यांनी आत्महत्या केल्यानंतर शुभदा पाटील आणि राहुल राऊत यांनी पलायन केलं होतं. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांच्या टीमने आता त्यांना सोलापुरातून ताब्यात घेतलं आहे.
औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठं नाव कमावलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरातील प्रख्यात उद्योगपती अर्जुन समूहाचे प्रमुख संतोष शिंदे यांनी पत्नी आणि मुलासह भयावह पद्धतीने आत्महत्या केल्यानंतर खळबळ उडाली. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा झालेला प्रयत्न, त्यानंतर माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि पोलीस अधिकारी राहुल राऊतने एक कोटीच्या खंडणीसाठी केलेला मानसिक छळ यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलताना कुटुंबाचा अंत केला. शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती.
माजी नगरसेविका आणि पोलिस अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या
शिंदे यांनी सुसाईड नोट लिहिली असून यामध्ये आत्महत्येसाठी चौघांना दोषी धरावे असे म्हटले आहे. एक कोटीच्या खंडणीसाठी त्रास देणारी माजी नगरसेविका, पोलिस अधिकारी राहुल राऊत तसेच संतोष शिंदे यांच्याकडून साडेसहा कोटी रुपये घेतलेले पुण्यातील विशाल बाणेकर आणि संकेत पाटे यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. या संदर्भातील फिर्याद संतोष यांचे नातेवाईक शुभम बाबर यांनी दिली.
दरम्यान, संतोष शिंदे यांनी ज्या पद्धतीने आयुष्याचा शेवट केला ते पाहून अक्षरशः काळजाचा थरकाप उडाला आहे. त्यांनी आपल्या बेडरूममध्ये आत्महत्या करताना विषप्राशन केले आणि गळ्यावर सुरी ओढून घेतली. त्यामुळे बेडरूममध्ये रक्ताचा सडा पसरला होता, इतकेच नव्हे तर भिंतींवरही रक्ताचे डाग पसरले गेले होते. बेडरूममधे सर्वत्र रक्ताचे डाग आणि फरशीवर रक्ताचे पाट वाहिल्यासारखी परिस्थिती होती. त्यामुळे मुलाने अशा पद्धतीने शेवट केल्याने त्यांच्या आईला प्रचंड मानसिक धक्का बसला असून त्यांना दवाखान्यामध्ये दाखल करावं लागलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संतोष यांच्यावर महिनाभरापूर्वी कर्नाटकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये त्यांना अटक होऊन वीस ते पंचवीस दिवस कारागृहात काढावी लागली होती. त्यामुळे ते निराशेमध्ये गेले होते. याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर सुद्धा झाला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा उद्योग सुरू करण्यासाठी लक्ष दिले. मात्र निराशा त्यांची पाठ सोडत नव्हती. बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवल्याने त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती.
ही बातमी वाचा: