नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचाराबद्दल अनेक जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. दिल्ली पोलिसांनी (ईस्टर्न रेंज) सांगितले की, आठ बस आणि 17 खासगी वाहनांचे नुकसान झाले आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, निषेध करणार्‍या शेतकर्‍यांनी 'ट्रॅक्टर परेड'साठी मान्य केलेल्या अटींचे उल्लंघन केले. त्यांनी हिंसाचार आणि तोडफोड केली, ज्यात किमान 86 पोलीस जखमी झाले.


दिल्ली पोलिसांनी ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत सात एफआयआर नोंदविल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. दिल्ली पोलिसांनी यापूर्वी ट्रॅक्टर परेड प्रकरणात तीन एफआयआर नोंदवले होते.


एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, की 'पूर्व जिल्ह्यात तीन एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत. द्वारका येथे तीन आणि शाहदरा जिल्ह्यात एका अशा एफआयआर दाखल झाल्या आहेत.’ तसेच यापेक्षा अधिक एफआयआर दाखल होणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.


दरम्यान ट्रॅक्टर रॅली दरम्यान आंदोलक शेतकऱ्यांनी अनेक अटींचं यावेळी उल्लघन केलं. शस्त्रे न बाळगता, निर्धारित मार्गाचा अवलंब करून आणि ट्रॉलीविना ट्रॅक्टरसह दिल्लीत प्रवेश करणे. अशा काही अटींवर शेतकरी नेते आणि पोलिस यांच्यात सहमती झाली होती. मात्र मंगळवारी ट्रॅक्टरच्या परेडमध्ये सहभागी असलेल्या अनेक निदर्शकांनी नियमांचं उल्लंघन केलं. पाच पेक्षा जास्त लोक ट्रॅक्टरवर बसणार नाहीत, या अटीचंही उल्लंघन आंदोलक शेतकऱ्यांनी केलं. त्यामुळे हा ट्रॅक्टर मार्च हिंसक झाला आणि यावेळी अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली.


दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय


गाझीपूर सीमेवरुन शेतकरी आयटीओ सोडून लाल किल्ल्यावर पोहोचले. हे शेतकरी पोलिसांशी भांडताना आणि पोलिसांना लाठीकाठ्यांनी मारहाण करताना दिसले. अश्रुधुराचे गोळे डागून पोलिसांनी आंदोलकांच्या जमावाला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दगडफेक केली. यामध्ये बसेस आणि पोलिसांच्या वाहनांसह अनेक वाहनांचे नुकसान झाले.





संयुक्त किसान मोर्चाने शेतकर्‍यांची ट्रॅक्टर परेड थांबवली आणि लोकांना तत्काळ त्यांच्या निषेधस्थळी परत येण्याचे आवाहन केले. संयुक्त किसान मोर्चाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही शेतकर्‍यांची प्रजासत्ताक दिनाची ट्रॅक्टर परेड तत्काळ रोखली आणि सर्व आंदोलकांना त्वरित आपापल्या निषेध स्थळांकडे परत जाण्याचे आवाहन केले आहे. हिंसाचारात भाग घेणाऱ्यांनी आमचा काहीही संबंध नाही असंही किसान मोर्चाने म्हटलंय.


संबंधित बातम्या






आंदोलन भडकल्यानं शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता, शेतकऱ्यांना होऊ शकते अटक - सूत्र