नवी दिल्ली : भारताने कोविडच्या जागतिक महामारीविरुद्धच्या लढाईत आता महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. प्रतिदिन नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांच्या संख्येने आज नीचांक गाठला आहे. एकूण 237 दिवसांच्या कालावधीनंतर गेल्या 24 तासांतील सर्वात कमी म्हणजे 9,102 नव्या रुग्णांची नोंद झाली. यापूर्वी 4 जून 2020 ला ही संख्या 9,304 इतकी होती. प्रतिदिन नोंदल्या जाणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सतत घसरण होत आहे. यामुळे रोज कोविडमुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्यादेखील कमी झाली आहे. गेल्या आठ महिन्यांहून जास्त काळानंतर (8 महिने 9 दिवस) देशात गेल्या 24 तासांत 120 पेक्षा कमी (117) व्यक्तींच्या मृत्यूची नोंद झाली आहे.


भारतातील सक्रीय कोविड रुग्णांच्या संख्येत घट होऊन आज ती 1,77,266 इतकी आहे. देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या प्रमाणात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आणखी कमी होऊन 1.66 टक्के झाले आहे. गेल्या 24 तासांच्या कालावधीत एकूण सक्रीय रुग्णांच्या संख्येत 6,916 ची घट झाली आहे. भारतातील दर दशलक्ष लोकसंख्येमागे असलेल्या रुग्णांचे प्रमाणदेखील जागतिक पातळीवर सर्वात कमी(7,736) आहे.


देशात सुरु असलेल्या कोविड-19च्या प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत 26 जानेवारी 2021 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत, 20,23,809 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. गेल्या24 तासांत, एकूण 7,764 सत्रांमध्ये झालेल्या लसीकरण मोहिमेत 4,08,305 जणांना लस देण्यात आली. लसीकरणासाठी आतापर्यंत देशात अशी 36,378 सत्रे पार पडली आहेत.


देशात आजपर्यंत 1.03 कोटी (1,03,45,985)व्यक्ती कोविड मुक्त झाल्या आहेत हे लक्षात घेता देशातील कोविड मुक्तीचा दर 96.90 टक्केवर पोहोचला आहे. कोविडमधून बरे झालेले रुग्ण आणि सध्या सक्रीय कोविड बाधित असलेले रुग्ण यांच्या संख्येतील तफावत सतत वाढतच असून आत्ता ती 1,01,68,719 इतकी आहे. गेल्या 24 तासांत 15,901 रुग्ण कोविडमधून बरे झाले. नव्याने रोगमुक्त झालेल्यांपैकी 83.68 टक्के रुग्ण देशाच्या 9 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.


देशात गेल्या 24 तासांत कोविडमुळे मरण पावलेल्या 117 जणांपैकी 63.25 टक्के रुग्ण पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत. महाराष्ट्रात या कालावधीत 30 लोकांचा मृत्यू झाला तर केरळमध्ये 17 आणि छत्तीसगड राज्यात 13 रुग्ण कोविड मुळे मरण पावले. भारतात दर दशलक्ष लोकसंख्येमागे 111 कोविड रुग्णांचे मृत्यू होत आहेत. जागतिक पातळीवर सर्वात कमी मृत्यू दर असणाऱ्या काही देशांमध्ये भारताचा समावेश आहे.