Delhi Shraddha Murder Case: संपूर्ण देशाला हादरवरून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील (Shraddha Murder Case) आरोपी आफताब पूनावाला याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बुधवारी आफताब पूनावाला याला व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे दिल्ली कोर्टात हजर करण्यात आलं होतं. संवेदनशील प्रकरण असल्यामुळे कोर्टानं व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे हजर करण्याची पोलिसांची मागणी मान्य केली होती. पोलिसांनी अफताबची 10 दिवसांची कोठडी मागितली होती.
आफताबच्या नार्को टेस्टची पोलिसांनी कोर्टात केलेली मागणी मान्य करण्यात आली आहे. अफताबही नार्को टेस्टसाठी तयार झाला आहे. याआधी कोर्टात सादर करण्यापूर्वी अफताबनं आपल्या जिवाला धोका असल्याचं म्हटलं होतं. संतप्त लोकांकडून कोर्ट परिसरात मारहाण होऊ शकते. फाशी द्या, फाशी द्या, अशा घोषणा ऐकल्याचं अफताबनं सांगितलं होतं. त्यामुळे अफताबला प्रत्यक्ष कोर्टात हजर न करता सुनावणी व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे करण्यात आली. यावेळी कोर्टानं अफताबला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर नार्को टेस्टला परवानगीही दिली.
पोलिसांकडे महत्वाचे पुरावे -
मागील चार दिवसांपासून पोलिसांच्या तावडीत असूनही आफताब श्रद्धाच्या हत्येची मिस्ट्री उलगडू देत नाहीये. पोलिसांच्या हाती फक्त परिस्थितीजन्य पुरावे आहेत. पण पोलिसांनीही तपासाची चक्रे वेगाने फिरवून चार महत्त्वाचे धागेदोरे मिळवले आहेत. श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर रक्ताने माखलेले बाथरुम धुण्यासाठी आफताबने अमाप पाण्याचा वापर केल्याचं समोर आलंय. दिल्लीमध्ये प्रत्येक घराला २० हजार लिटीर पाणी मोफत आहे... त्यामुळे दिल्लीत बहुतांश घरांमध्ये पाण्याचं बिल येत नाही... पण गेल्या पाच महिन्यांमध्ये आफताबच्या फ्लॅटमध्ये पाण्याचं बिल ३०० रुपये आलं होतं. आणि ते थकलंही होतं...म्हणजे हत्येचे डाग पुसण्यासाठी आफताबने जे पाणी वाहून टाकलं. तेच त्याच्याविरोधातला एक पुरावा बनलं. श्रद्धाच्या मृतदेहांचे तुकडे ज्या फ्रिजमध्ये लपवून ठेवायचे होते. त्या फ्रिजची खरेदी केलेल्या दुकानातही पोलीस पोहोचले. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आफताबने ज्या दुकानातून करवत खरेदी केली त्याही दुकानामध्ये पोलीस पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रद्धाची ओळख पटू नये, यासाठी आफताबने तिचा चेहरा जाळून टाकल्याची माहिती समोर आली आहे... पण जेव्हा तिचा चेहरा जळला नाही... तेव्हा चेहरा मातीमध्ये माखवून त्याने जंगलात फेकून दिला.
आधी प्रेम, मग हत्या; पण का?
आफताब पूनावालानं पोलिसांना तपासादरम्यान सांगितलं की, "हत्येपूर्वी काही दिवस श्रद्धानं आफताबच्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता. वैतागल्यामुळे रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली. अमेरिकन टेलिव्हिजन मालिका 'डेक्स्टर' मधून श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कल्पना सुचली. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ठेवण्यासाठी आरोपीनं 300 लिटरचा फ्रिज विकत घेतला. तसेच, घरातील मृतदेहाचा गंध लपवण्यासाठी तो अगरबत्ती आणि रुम फ्रेशनरचा वापर करत होता. मध्यरात्री दोन वाजता आफताब श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकण्यासाठी घराबाहेर पडायचा आणि दिल्लीतील वेगवेगळ्या भागांत ते फेकून द्यायचा. हे करताना तो आवर्जुन एका गोष्टीकडे लक्ष द्यायचा की, कोणता तुकडा सडतोय, हे पाहुनच तो कोणता तुकडा फेकून द्यायचा हे ठरवायचा.