Nitin Gadkari Falls Sick : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची तब्येत एका कार्यक्रमादरम्यान अचानक बिघडली. पश्चिम बंगालमधील (West Bengal) सिलीगुडी (Siliguri) इथल्या डागापूरमधील कार्यक्रमाला नितीन गडकरी उपस्थित होते. परंतु कार्यक्रमादरम्यानच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. यानंतर जवळच्या रुग्णालयाचं पथक कार्यक्रमस्थळी पोहोचलं आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. शरीरातील साखरेची पातळी (Sugar Level) कमी झाल्यामुळे नितीन गडकरी यांची प्रकृती खालावली असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. सध्या नितीन गडकरी यांची प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.


पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये सरकारी योजनांचं उद्घाटन करण्यासाठी नितीन गडकरी उपस्थित होते. त्यांनी सिलीगुडीमध्ये 1206 कोटी रुपये खर्चाच्या 3 NH प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. हा कार्यक्रम सुरु असतानाच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर सुकना इथलं प्राथमिक आरोग्य केंद्राचं पथक पोहोचलं आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. 


याआधी कार्यक्रमादरम्यान गडकरींची प्रकृती बिघडली होती
कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरी यांची प्रकृती खालावण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी डिसेंबर 2018 मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकृती खालावली होती. गडकरी मंचावरच बेशुद्ध पडले. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव उपस्थित होते. राज्यपालांनीच त्यांना मंचावर आधार दिला. यानंतर नितीन गडकरी यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तर त्याआधी एप्रिल 2010 मध्ये दिल्लीतील जंतरमंतर एका कार्यक्रमात ते चक्कर येऊन कोसळले होते.


मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून प्रकृतीची विचारपूस
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नितीन गडकरी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. यासोबतच ममता बॅनर्जी यांनी सिलीगुडीच्या पोलीस आयुक्तांना त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.


वजन कमी करण्यासाठी 2011 मध्ये शस्त्रक्रिया
नितीन गडकरी यांना टाईप 2 प्रकारचा मधुमेह असून वजन कमी करण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. सप्टेंबर 2011 मध्ये, वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेह नियंत्रित करण्यासाठी नितीन गडकरी यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया वजन कमी करण्यासाठी केली जाते.


गडकरींच्या सिलीगुडी दौऱ्याचं महत्त्व काय?
नितीन गडकरी यांचा सिलीगुडी दौरा हा उत्तर बंगालमध्ये पायाभूत सुविधांचे मोठे प्रकल्प राबवण्यास उत्सुक असल्याचं दाखवण्याच्या भाजपच्या योजनेचा एक भाग असल्याचं म्हटलं जातं. नितीन गडकरी यांचे आज अनेक पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत. परंतु प्रकृती पाहता या कार्यक्रमांना ते उपस्थित राहितील की नाही बाबत साशंकता आहे.