नवी दिल्ली : पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला  (Sidhu Moose Wala murder) हत्या प्रकरणात लाॅरेन्स बिश्नोईला (Lawrence Bishnoi) दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमने (Delhi Police Special Cell) तिहार जेलमधून ताब्यात घेतले आहे. गँगस्टर बिश्नोईचा 5 दिवसांचा ताबा घेतला आहे. दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल बिश्नोईकडे मुसेवाला हत्याकांड प्रकरणात चौकशी करणार आहे. त्याचबरोबर काला जठेडी आणि काला राणाच्या खून प्रकरणी त्याच्याकडे चौकशी होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


तिहार जेलमध्ये बंद असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (Delhi Police Special Cell) रिमांडवर घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,बिष्णोईला कोर्टामार्फत अन्य एका प्रकरणात 5 दिवसांच्या रिमांडवर घेण्यात आले होते. मात्र आता सिद्धू प्रकरणात त्याची चौकशी केली जाणार आहे. 


लॉरेन्सला एन्काउंटर होण्याची भीती


कॅनडास्थित गोल्डी ब्ररारने मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. यानंतर तिहारमध्ये लॉरेन्सची सुरक्षा वाढवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पंजाब पोलिसांनी नेण्यापासून रोखण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईच्या वतीने काल न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. लॉरेन्सला आता एन्काउंटरची भीती वाटू लागली आहे. 


गायक सिद्धू मुसेवालांवर ऑटोमॅटिक असॉल्ट रायफलने 30 गोळ्या झाडण्यात आल्या. मुसेवाला यांनी या वर्षाच्या सुरुवातीला काँग्रेसच्या तिकिटावर पंजाब विधानसभा निवडणूक लढवली होती. लॉरेन्स बिश्नोई दिल्ली विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे. लॉरेन्सच्या वकिलाने मुसेवाला प्रकरणात त्याच्या सहभाग नाकारला आहे. दुसरीकडे पंजाबचे पोलीस प्रमुख व्ही. के. भवरा यांनी ही घटना टोळीयुद्धातून झाली असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. 


 इतर महत्त्वाच्या बातम्या