Rajya Sabha Election 2022 : भाजपकडून १० जूनला होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी 22 उमेदवारांची यादी घोषित करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये एकही मुस्लीम चेहरा (Muslim Face in BJP) देण्यात आलेला नाही. राज्यसभेत भाजपकडून (BJP) 3 मुस्लीम खासदार पाठवण्यात आले होते. मुख्तार अब्बास नक्वी (Mukhtar Abbas Naqvi) सय्यद जफर इस्लाम आणि एम. जे. अकबर यांचा त्यामध्ये समावेश होता. या तिघांचा कार्यकाळ यंदा समाप्त होत आहे. या तिन्ही उमेदवारांना भाजपने पुन्हा संधी दिलेली नाही. त्यामुळे राज्यसभेत भाजपकडून कोणीही मुस्लीम चेहरा नसेल. 


मुख्तार अब्बास नक्वी यांचा राज्यसभेचा कार्यकाळ 7 जुलैला समाप्त होत आहे. नक्वींना पुढील सहा महिन्यात खासदारकी मिळाली नाही, तर त्यांचे मंत्रिपद जाण्याचे अटळ आहे. मात्र, त्यांना रामपूर लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे. 


सय्यद जफर इस्लाम यांचा कार्यकाळ ४ जुलै आणि एम. जे. अकबर यांचा कार्यकाळ २९ जुनला समाप्त होत आहे. राष्ट्रपती नियुक्त कोट्यातून अजून 7 जागा अजूनही रिक्त आहेत. त्यामुळे या कोट्यातून भाजप मुस्लीम चेहऱ्याला संधी देणार का ? याची चर्चा रंगली आहे.  


एनडीएमध्ये केवळ एक मुस्लीम खासदार


दुसरीकडे लोकसभेतही भाजपकडून कोणताही मुस्लीम चेहरा नाही. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपकडून 6 मुस्लीम उमेदवार रिंगणात होते , पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.एनडीएमध्ये केवळ एक मुस्लीम खासदार आहे. खगडियामधून मेहबूब अली कैसर लोजपकडून निवडून आले आहेत. 


राज्यसभेच्या 15 राज्यांमधील एकूण 57 जागांसाठी 10 जुनला मतदान होत आहे. या सर्व जागांचा कालावधी जुन ते ऑगस्टमध्ये कार्यकाळ संपत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. काँग्रेससह अन्य पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.यामध्ये अनेक दिग्गजांचा पत्ता कट झाला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या