नवी दिल्ली : राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपनं 22 उमेदवारांची यादी जाहीर केलीय. यावेळी राज्यसभेसाठी निवड करताना भाजपनं पक्षातल्या अनेक निष्ठावंतांचा, दिग्गजांचा पत्ताही कट केलाय. शिवाय लोकसभा 303 आणि राज्यसभा जवळपास 100 अशा 400 खासदारांच्या पक्षाकडे एकही मुस्लीम चेहरा नसण्याची शक्यताही त्यामुळे निर्माण झालीय.
राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून अनेक दिग्गजांचा पत्ता कट करण्यात आलाय. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, महाराष्ट्रातले खासदार विनय सहस्त्रबुद्धे, राजस्थानचे नेते ओमप्रकाश माथूर, पक्षाचे राष्ट्रीय महासचिव दुष्यंत गौतम, माजी केंद्रीय मंत्री शिवप्रताप शुक्ला ही काही महत्वाची नावं. या सर्वांमधली समानता म्हणजे सगळे पक्षाच्या विचारसरणीशी एकनिष्ठ...जुने कार्यकर्ते. पण राज्यसभेची दुसरी संधी काही त्यांना मिळालेली नाही.
महाराष्ट्रातून भाजपने तीन उमेदवार दिलेत. त्यापैकी दोन हे नुकतेच पक्षात आलेले आहेत. अनिल बोंडे हे 2014 मध्ये भाजपमध्ये आले तर धनंजय महाडिक हे 2019 ला भाजपमध्ये आले. भाजपच्या मुशीत घडलेले, पक्षाच्या विचारसरणीशी एकनिष्ठ विनय सहस्त्रबुद्धे यांचा पत्ता मात्र कट झाला आहे. विनय सहस्त्रबुद्धे हे आधी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचं काम पाहत होते. सध्या ते इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स या परराष्ट्र विभागाशी संबंधित महत्वाच्या संस्थेचे अध्यक्षही आहेत. पण त्यांना राज्यसभा मात्र नाकारण्यात आली आहे. शिवाय मुख्तार अब्बास नक्वी यांच्या राज्यसभा उमेदवारीवरही बराच सस्पेन्स निर्माण झाला. नक्वी हे सध्या केंद्रात मंत्री आहेत. पुढच्या सहा महिन्यात त्यांना लोकसभा किंवा राज्यसभेचं सदस्यत्व टिकवता आलं नाही तर त्यांचं मंत्रिपद धोक्यात येऊ शकतं. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप त्यांना रामपूर लोकसभा पोटनिवडणुकीत उतरवण्याची शक्यता आहे. आजम खान यांच्या लोकसभा सदस्यत्वाच्या राजीनाम्यानंतर या जागेवर 23 जून रोजी निवडणूक होतेय.
संसदेच्या दोन्ही सभागृहात भाजपचा एकही मुस्लिम खासदार नसणार?
- लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहात भाजपचा एकही मुस्लिम खासदार नसण्याची स्थिती निर्माण होऊ शकते.
- लोकसभा निवडणुकीत भाजपनं 6 मुस्लिमांना तिकीट दिलं होतं, पण एकही निवडून आला नाही. त्यामुळे आधीच 303 खासदारांमध्ये एकही मुस्लीम चेहरा नव्हता
- राज्यसभेत मुख्तार अब्बास नक्वी, एम जे अकबर, जफर इस्लाम असे तीन मुस्लिम चेहरे होते. पण या तिघांनाही पुन्हा राज्यसभा नाकारण्यात आलीय.
- राष्ट्रपती नामनिर्देशित कोट्यातून सध्या 7 जागा रिक्त आहेत. त्यात भाजप कुणी मुस्लिम चेहरा देऊन ही उणीव भरून काढणार का हे पाहावं लागेल.
याआधी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करतानाही मोदींनी धक्कातंत्राचा वापर करत अनेक दिग्गजांना घरी बसवलं होतं. प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद यांच्यासह अनेक बड्या मंत्र्यांना हटवण्यात आलं. आता राज्यसभेतही तीच नीती वापरली जातेय.
राज्यपालांच्या निवडी असो, मंत्रिपदाची संधी असो की राज्यसभा...एकदा दिली की पुरेसं...कारण पक्षाच्या विस्तारात नव्या लोकांनाही सामावून घ्यायचं आहे. त्यामुळेच मोदी-शाह ही पॉलिसी राबवत असल्याचं समजतंय. भाकरी फिरवणं, सतत कामगिरीचं प्रेशर बनवून ठेवणं आणि कुणालाच सेट होऊ न देणं हे देखील त्यातून आपसूकच साध्य होत असल्याची त्यामुळे चर्चा आहे.