(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'मोदी, जी हमारे बच्चों की वॅक्सिन विदेश क्यों भेज दी...' दिल्लीत मोदींविरोधात पोस्टर, नऊ जणांना अटक
लसीकरण अभियानाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पोस्टर लागल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तातडीने कारवाई करत नऊ जणांना अटक केली आहे. 'मोदी, जी हमारे बच्चों की वॅक्सिन विदेश क्यों भेज दी...' असे पोस्टर दिल्लीत लागले आहेत.
नवी दिल्ली : कोरोना लसीकरण अभियानाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात राजधानी दिल्लीत पोस्टर लागले आणि त्यावर दिल्ली पोलिसांनी तातडीने धडक कारवाई सुरु केली. पोलिसांनी या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. तर दिल्लीतील वेगवेगळ्या दहा ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 'मोदी, जी हमारे बच्चों की वॅक्सिन विदेश क्यों भेज दी...' असे पोस्टर दिल्लीत लागल्यानंतर दिल्ली पोलिसांनी कारवाई केली आहे.
जे लोक पोस्टर लावत होते त्यांनी आम आदमी पक्षाच्या एका नगरसेवकाच्या सांगण्यावरुन आपण हे करत असल्याचं म्हटलं आहे. तर याबाबत कोणतीही माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं. पोलीस या पोस्टर मागे आम आदमी पक्षाचं काय कनेक्शन आहे याचाही तपास घेत आहेत. पोस्टर लावणाऱ्या लोकांकडून जवळपास 800 ते 900 पोस्टर 20 मोठे बॅनर पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, पूर्व दिल्लीतून चार, ईशान्य दिल्लीतून दोन, उत्तर दिल्लीतून एक द्वारकामध्ये दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान भारतीय युथ काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास बी व्ही यांच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेची टीम कालच त्यांच्या कार्यालयात पोहोचली होती. श्रीनिवास मागील अनेक दिवसांपासून कोविड-19 काळात गरजूंना मदत करत आहेत. कोविड-19 ची औषधांच्या अवैध वितरणाबाबत गुन्हे शाखेने त्यांची चौकशी तेली. रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी, त्यांच्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर, औषधं आणि अॅम्ब्युलन्ससाठी सोशल मीडियावर आलेल्या शेकडो विनंतीसाठी श्रीनिवास यांनी आपल्या कार्यालयात एक वॉर रुमचीही स्थापना केली आहे.
दिल्ली पोलीस श्रीनिवास यांच्या चौकशीसाठी तातडीने पोहोचल्यानंतर त्याबद्दल चर्चा सुरु झाली होती. त्या पाठोपाठ दिल्ली पोलिसांनी दाखवलेल्या आणखी एका तत्परतेमुळे चर्चांना आणखी बळ मिळालं आहे.