मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मुमका या गावातील हवेलीचा अखेर लिलाव झाला. दिल्लीचे वकील अजय श्रीवास्तव यांनी दाऊदच्या या हवेलीची सर्वाधिक म्हणजे 11,20,000 रुपये इतकी बोली लावून ती जिंकली. हा लिलाव केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने लावला होता. अर्थ मंत्रालयाने सफेमा आणि एनडीपीएस कायद्यान्वये जप्त केलेल्या 17 संपत्तीचा लिलाव करण्याचे घोषित केले होते, त्यापैकीच ही एक हवेली आहे.


2 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारतर्फे दाऊदची ही संपत्ती लिलावात काढण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी दिल्लीचे दोन वकील, ज्यात अजय श्रीवास्तवांचा समावेश होतो, त्यांनी दाऊदची ही संपत्ती विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.


40 वर्षापूर्वी इथेच राहत होता दाऊदचा परिवार
मुमका गावातील या हवेलीमध्ये दाऊदच्या बालपणाचा काही काळ गेल्याचे सांगण्यात येतंय. साधारणपणे 1983 साली दाऊद या हवेलीत शेवटचा आला होता. त्यानंतर त्याच्या वडिलांची मुंबई पोलीसात भरती झाल्याने त्यांनी गाव सोडले. त्यांच्या पश्चात दाऊदची एक बहिण आणि तिची मुलगी या घरात राहत होत्या. पण जवळच्या जगबुडी नदीत कपडे धुवायला गेल्या असताना त्या दोघींचाही बुडून मृत्यू झाला. नंतर ती हवेली तशीच मोकळी राहिली.


ही हवेली दोन मजली आहे. असे सांगितले जाते की या जागेशी दाऊदचा भावनिक लगाव आहे. कारण याच ठिकाणी त्याचे बालपण गेलंय. आज ही हवेली एका पडक्या खंदकात रुपांतरीत झाली आहे.


अजय श्रीवास्तव यांनी सांगितले होते की जर त्यांनी दाऊदची ही संपत्ती विकत घेतली तर ते त्या हवेलीली पाडून त्या ठिकाणी सनातन धर्माची शिक्षा देणारे केंद्र उभा करणार आहेत. त्यांनी सांगितले होते की, "दाऊदला घाबरायचं काही कारण नाही. आम्ही हे घर घेतोय हा एक प्रतिकात्मक संदेश आहे. आता या घरात सनातन धर्माची शिक्षा देणारी संस्था सुरु करणार आहे."


या आधी अजय श्रीवास्तव यांनी दिल्लीत शिवसैनिक म्हणून काम केलं आहे. पाकिस्तान विरोधच्या क्रिकेट सामन्याला विरोध म्हणून त्यांनी दिल्लीतील फिरोजशहा कोटला मैदानाच्या पिचवर खड्डे काढले होते. या आधीही त्यांनी दाऊदच्या दोन संपत्तीचा ताबा घेतला आहे. मुंबईच्या नागपाडा परिसरातील दाऊदच्य़ा मालकीच्या दोन दुकानांची खरेदी त्यांनी केली होती.


केंद्र सरकारने दाऊदला फरार घोषित केल्यानंतर स्मगलिंग विरोधी कायदा सफेमा अंतर्गत सरकारने दाऊदच्या अनेक संपत्तीवर टाच आणली होती. त्यामध्ये ही एक हवेली आहे. 27 गुंठ्यात पसरलेल्या या हवेलीची रिझर्व्ह प्राईज ही 5,35,800 रुपये इतकी लावली होती.


महत्वाच्या बातम्या:


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री वर दाऊदच्या हस्तकाची धमकी; गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश


अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीमध्ये असल्याची पाकिस्तानची कबुली