Delhi Farmers Protest : शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा 'चलो दिल्ली'ची (Chalo Delhi) हाक दिली आहे. शेतकरी संघटनाच्या दिल्ली चलोच्या घोषणेनंतर पंजाबमधील सर्व शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा वळवला आहे. आज 6 मार्चला मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर पोहोचण्याची शक्यता आहे. शेतकरी मोर्चामुळे दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. दिल्ली आणि सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रशासन अलर्टवर आहे. रेल्वे स्थानक आणि बसस्थानकांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांची 'चलो दिल्ली'ची हाक
पंजाबमधील विविध शेतकरी संघटनांनी दिल्लीवर मोर्चा नेण्याचं आवाहन केलं आहे. यानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने आगेकूच सुरु केली आहे. त्यामुळे आज राजधानी दिल्लीच्या सीमेवर मोठ्या संख्येने शेतकरी दाखल होण्याची शक्यता आहे. एमएसपीवर (MSP) कायदेशीर हमी मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. संयुक्त किसान मोर्चाने शेतकऱ्यांचा 'दिल्ली चलो मार्च' 29 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलला होता, त्यानंतर आंदोलनाची पुढील रणनीती जाहीर केल्यानंतर आजपासून पुन्हा हा मार्च सुरु करण्यात आला आहे.
रेल्वे स्थानके आणि बसस्थानकांवर पथके तैनात
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानके आणि बसस्थानकांवर पथके तैनात करण्यात आली आहेत. रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडवर जास्तीत जास्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, कारण शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांना दिल्लीत पोहोचण्यास सांगितलं आहे.
दिल्लीत कलम 144 लागू
सुत्रांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. या अंतर्गत एका परिसरात चार किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. आंदोलक जमतील अशा सर्व शक्य ठिकाणी पोलीस दलाची अतिरिक्त पथके तैनात करण्यात आली आहेत. शहरातील रस्त्यांवर कोणतेही बॅरिकेडिंग असणार नाही. मात्र, पोलिसांकडून रस्त्यांवरील वाहनांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येईल.
'रेल्वे रोको' करण्याचीही तयारी
शेतकरी संघटनांनी 10 मार्च रोजी देशभरात 'रेल रोको' आंदोलनाची हाक दिली आहे. रेल्वे पोलीस उपायुक्त केपीएस मल्होत्रा यांनी सांगितलं की, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून रेल्वे स्थानकांच्या आत आणि बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. नवी दिल्ली, जुनी दिल्ली, आनंद विहार, सराई रोहिल्ला या दिल्लीतील काही प्रमुख रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.