IMD Rain Forecast : देशाच्या अनेक भागात अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) थैमान घातलं असून आजही पावसाची शक्यता (Rain Alert) कायम आहे. पुढील 24 तासात महाराष्ट्रासह (Maharshtra Rain) देशात अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. काश्मीर खोऱ्यासह पर्वतीय भागात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. परिणामी उत्तर भारतात तापमानात घट (Cold Weather) झाली आहे. महाराष्ट्रातही अनेक भागात अवकाळी पावसानं झोडपलं असून हवेत गारवा पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेशात गडगडाटासह मुसळधार पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याता अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


अवकाळी पावसाची शक्यता कायम


भारतीय हवामान विभागाने (IMD) बुधवारी पावसाची शक्यता वर्तवली आहे. येत्या काही दिवसांत ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाचा अंदाज आयएमडीने (IMD) वर्तवला आहे. आयएमडीने ईशान्येकडील राज्यांमध्ये गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये कमाल तापमानात घट होणार असून अंशतः ढगाळ आकाश असेल.


आज 'या' भागात पावसाची शक्यता


आयएमडीने दिलेल्या ताज्या माहितीमध्ये सांगितलं आहे की, आज पूर्व आणि ईशान्य भारतात गडगडाटी वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 6 मार्च आणि 7 मार्चच्या रात्री पश्चिम हिमालयीन प्रदेशात जोरदार पाऊस आणि हिमवृष्टी पाहायला मिळेल. महाराष्ट्रात विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज आहे.






देशाच्या काही भागात जोरदार पाऊस


आयएमडीच्या (IMD) अंदाजानुसार, आसाम, मेघालय आणि नागालँड सारख्या ईशान्येकडील राज्यांमध्ये आज पावसाची शक्यता कायम आहे. ईशान्य आसाममध्ये कमी उष्णकटिबंधीय स्तरावर चक्रीवादळ परिवलन आहे. त्याच्या प्रभावाखाली, पुढील तीन दिवसांत अरुणाचल प्रदेशात विखुरलेला पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे.


वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल


उत्तर प्रदेशात पावसाची शक्यता नाही. पश्चिमेकडून जोरदार वारे वाहत असून, त्यामुळे बहुतांश भागात पारा अजूनही सामान्यापेक्षा कमी आहे. मात्र, या आठवड्यानंतर हवामानात काही बदल होण्याची शक्यता आहे. नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्सचा हिमालयीन प्रदेशावर परिणाम होण्याची शक्यता आहे, यामुळे बुधवारी आणि गुरुवारी म्हणजे 6 आणि 7 मार्च दरम्यान जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विखुरलेला पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.