(Source: ECI/ABP News/ABP Majha)
12 वर्षांवरील मुलांसाठी लवकरच येणार Corbevax? DCGI च्या कमिटीने केली शिफारस
COVID 19 Vaccine : बायोलॉजिकल-ई कंपनीच्या कार्बेवॅक्स लशीच्या आपत्कालिन वापरासाठी औषध नियामक प्रशासनाची (DCGI) तज्ज्ञ समितीने शिफारस केली आहे.
COVID 19 Vaccine : 12 वर्षांवरील मुलांसाठी लवकरच Corbevax ही लस उपलब्ध होणार आहे. बायोलॉजिकल-ई कंपनीच्या कार्बेवॅक्स लशीच्या आपत्कालिन वापरासाठी औषध नियामक प्रशासनाची (DCGI) तज्ज्ञ समितीने शिफारस केली आहे. त्यामुळे लवकरच या लसीला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. Corbevax या लशीला मान्यता मिळाली तर 12 ते 18 वयोगटातील मुलांना लसीकरण करणं शक्य होणार आहे. तसं झालं तर पुढच्या शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी 12 वर्षांवरील शालेय विद्यार्थ्यांचं लसीकरणाचा मार्ग मोकळा होईल.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने आतापर्यंत 15 वर्षांपेक्षा लहान मुलांच्या लसीकरणाबाबत कोणताही निर्णय घेतला आहे. निती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी नुकतेच एका पत्रकार परिषदेत लवकरच लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात केली जाऊ शकते, असे सांगितले होते. लसीकरणासाठी आणखी लोकांना सामाविष्ट करयला हवे, असेही त्यांनी सांगितले होते.
भारताच्या औषध नियामक प्रशासनाने याआधीच Corbevax या लसीला आपतकालीन मान्यता दिली आहे. हैदराबादच्या 'बायोलॉजिकल ई' (Biological E) कंपनी निर्मित असलेली 'कॉर्बेवॅक्स' (Corbevax) ही लस कोविडविरुद्ध 90 टक्के प्रभावी ठरण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. कोरोनाविरोधात भारतात तयार झालेली ही आरबीडी प्रोटीन सब-युनिटवर आधारीत लस आहे. दरम्यान बायोलॉजिकल ईने अलीकडेच लसीच्या 5-12 वर्षे आणि 12-18 वर्षे वयोगटासाठीच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत. Corbevax ही भारतात विकसित झालेली तिसरी लस आहे. तर नॅनोपार्टिकल कोवोवॅक्स (COVOVAX) लसीचे उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट करणार आहे.
कॉर्बेवॅक्स सर्वात स्वस्त लस
आतापर्यंत भारतात फायझर, मोडर्ना, कोविशिल्ड, स्पुतनिक व्ही, कोवॅक्सिन या लसींना मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर लवकरच कार्बेवॅक्स लस लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. कोविडच्या इतर लसांप्रमाणेच कॉर्बेवॅक्सचे दोन डोस घ्यावे लागतील. मात्र ही लस स्वस्तात उपलब्ध होणार आहे. कार्बेवॅक्स ही लस तयार करण्यासाठी 50 रुपयांपर्यंत खर्च आहे. पण ही बाजारात 250 रुपयांत उपलब्ध होईल. बायोलॉजिकल ई कंपनीने सांगितले की, लसीपासून नफा मिळवणे हे त्यांचे लक्ष्य नाही, तर लोकांची सेवा करणे हे आहे. यामुळे, इतर लसींच्या तुलनेत त्याचे दर कमी ठेवले गेले आहेत.