Cyclone Tauktae : पंतप्रधान नरेंद्र मोदी (आज) बुधवारी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या गुजरात राज्याला भेट देणार आहेत. वादळाचा सर्वाधिक मारा बसलेल्या दीव भागाला ते भेट देणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


प्रभावित भागाची हवाई सफर करत ते चक्रीवादळामुळं झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये उना, दीव, जाफराबाद, महुआ या भागांचा पाहणी दौरा पंतप्रधान करतील अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. 


तोक्तेमध्ये गुजरातमधील 27 जणांनी जीव गमावल्याचं वृत्त आहे. गुजरातमधील किनारी भागात या वादळामुळं मोठं नुकसान झालं असून, इथले वीजेचे खांब, मोठाले वृक्ष आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शिवाय इथल्या रस्त्यांचंही नुकसान झाल्यी माहिती समोर येत आहे. 


सोमवारीच पंतप्रधान मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासोबत वादळापूर्वीच्या तयारीसंदर्भात चर्चा घेत राज्य वादळासाठी कितपत तयार आहे याचा आढावा घेतला होता. सोबतच त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि दीव-दमणचे राज्यपाल प्रफुल्ल पटेल याच्याशीही वादळाच्या पार्श्वभूमीवर संपर्क साधला होता. 


Cyclone Tauktae : तोक्ते चक्रीवादळात समुद्रात अडकलेल्या लोकांना वाचवण्यात  युद्धनौका, हेलिकॉप्टर्सचा महत्त्वाचा वाटा


महाराष्ट्रालाही वादळाचा तडाखा 


तोक्ते चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील कोकण, पालघर, मुंबईत तडाखा पाहायला मिळाला. रत्नागिरी, देवबाग आणि इतर कोकण पट्ट्यामध्ये फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, आपण एका पिढीनं मागे गेल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी आणि बागायतदारांनी दिल्या. अलिबागमध्येही किनारपट्टी भागात असणाऱ्या अनेक गावांना या वादळामुळं मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागला आहे. तर, मुंईतही वादळामुळं काही प्रमाणात नुकसान झालं. सध्याच्या घडीला वादळाचा फटका बसलेल्या शेतकरी आणि बागायतदारांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली आहे.