नवी दिल्ली : देश सध्या कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेच्या कचाट्यात सापडला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोनामुळे दररोज 4 हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. यामुळेच लसीची मागणीही वाढत आहे. अनेक राज्य सरकार लस नसल्याबद्दल प्रश्न उपस्थित करीत आहेत. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ, अद्दार पूनावाला यांनी एक निवेदन जारी केले आहे की, भारत हा एक मोठा लोकसंख्या असलेला देश आहे आणि इतक्या मोठ्या लोकसंख्येला 2-3 महिन्यांत लसीकरण करणे शक्य नाही. सोबतचं आम्ही भारतीयांसाठी असलेल्या लसी निर्यात केल्या नाहीत, संपूर्ण भारताचं लसीकरण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे स्पष्टीकरणही सीरम इन्स्टिट्यूटने दिलंय.






जानेवारीत जेव्हा आमच्याकडे लसींचा भरपूर साठा होता, तेव्हा लसीकरण मोहीमेने वेग घेतला नव्हता आणि अनेकांना तर आपण लशीशिवाय कोरोनावर विजय मिळवला असं वाटलं होतं, त्यामुळे लसीकरण मोहीम मंदावली. त्याकाळात भारत सरकारने माणुसकीच्या नात्याने लस निर्यात केली आणि त्यामुळेच जेव्हा आपल्याकडे कोरोनाची दुसरी लाट आली तेव्हा आपण मदत केलेल्या देशांनी आपल्याला मदत केली, असे सीरमने सांगितलंय. जर आपण एकूण डोस बनविणे आणि वितरित करण्याकडे पाहिले तर आपण जगातील पहिल्या 3 क्रमांकावर आहोत. आम्ही सतत उत्पादन वाढवत देत असून भारताला प्राधान्य देत आहोत. आम्हाला आशा आहे की आम्ही या वर्षाच्या अखेरीस COVAX आणि इतर देशांमध्ये लस देणे सुरू करू.


भारतीय जनतेला गरज असताना लशींची निर्यात केली नाही. अमेरिकन लशीला आप्तकालीन वापराला परवानगी मिळाल्यानंतर  दोन महिन्यांनी सीरमला मिळाली तरीही सीरमने आतापर्यंत 20 कोटी डोस वितरीत केले आहेत. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात लसीकरण मोहीम 2-3 महिन्यात संपणे शक्य नसते. त्यात अनेक आव्हान आहेत. जगात लसीकरण पूर्ण व्हायला 2 ते 3 वर्ष लागतील. लसींचं उत्पादन वाढवणे आणि लसीबाबत भारताला प्राधान्य देणं सुरुच राहिल, असेही या निवेदनात म्हटले आहे.