(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cyclone Biparjoy : चक्रीवादळाचा जोर वाढला! मुंबई, रायगडसह 'या' किनारपट्टी भागात धोक्याचा इशारा
IMD Alert : भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या तीन दिवसांत 'बिपरजॉय' (Cyclone Biparjoy) तीव्र चक्रीवादळात रूपांतर होऊ शकतं.
Cyclone Biporjoy Update : देशाच्या किनारपट्टीला 'बिपरजॉय' चक्रीवादळाचा (Biparjoy Cyclone) धोका आहे. बिपरजॉय चक्रीवादळ येत्या 48 तासांत आणखी तीव्र होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या चक्रीवादळामुळे भारताच्या किनारपट्टी भागातही परिणाम होणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या तीन दिवसांत 'बिपरजॉय' (Cyclone Biparjoy) तीव्र चक्रीवादळात रूपांतर होऊ शकतं. या चक्रीवादळाचा परिणाम तीन दिवस दिसू शकतो. देशाच्या किनारपट्टी भागातील आपत्ती व्यवस्थापन पथकांना आधीच सतर्क करण्यात आलं आहे.
चक्रीवादळाचा जोर वाढला
देशात मुंबई, पालघरसह कोकण किनारपट्टी भागात या चक्रीवादळाचा परिणाम दिसू शकतो. गुजरातलाही या चक्रीवादळाचा फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील किनारपट्टी भागात मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. मुंबई, पालघर, रायगज, रत्नागिरी, सिंधुदुर्ग किनारपट्टीवर लाटा उसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मच्छीमारांनी खोल समुद्रात जाण्यास मज्जाव
याआधीच हवामान विभागाने, 8 ते 10 जून दरम्यान समुद्रात उंच लाटा येण्याची शक्यता वर्तवली आहे. 12 जूनपर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मुंबई, रायगडसह 'या' किनारपट्टी भागात धोक्याचा इशारा
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने पुढे सरकरत आहे. सध्या चक्रीवादळ कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी भागातून पुढे सरकत आहे, पण याचा किनारपट्टी भागात परिणाम दिसून येईल. किनारपट्टी भागात जोरदार वादळी वारे वाहतील आणि काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ पाकिस्तानात धडकण्याची शक्यता
दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळ पाकिस्तानात धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम भारत, ओमान, इराण आणि पाकिस्तानसह अरबी समुद्राला लागून असलेल्या देशांवर होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ आता पूर्व-मध्य अरबी समुद्रातून हळूहळू उत्तर आणि वायव्येकडे सरकत आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर मच्छिमारांना खोल समुद्रातून परतण्यास सांगण्यात आलं आहे. सध्या हे वादळ पोरबंदरच्या नैऋत्येला 930 किमी अंतरावर आहे. हवामान खात्यानुसार, या वादळामुळे ताशी 135 ते 145 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. याचा परिणाम किनारी भागात होऊ शकतो.