Asani Cyclone News : ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशमधील वेगवेगळ्या भागात मंगळवारपासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. असनी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. बंगालच्या उपसागरातील खोल दाब वायव्य दिशेने 16 किमी प्रतितास वेगाने पुढे सरकत आहे. त्यामुळे चक्रीवादळ तीव्र झाले आहे. ही वादळाची प्रक्रिया आज पहाटे साडेपाच वाजल्यापासून सुरु झाली आहे.


आजपर्यंत ही प्रणाली चक्रीवादळाच्या स्वरुपात राहील. त्यानंतर ती तीव्र चक्री वादळात रुपांतरित होईल असे हवामाना विभागाने म्हटले आहे. 10 मे च्या रात्रीपर्यंत या स्वरूपात राहील. त्यानंतर, 11 आणि 12 मे रोजी आणखी एक चक्री वादळ तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितली आहे. दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरावर, कार निकोबारच्या पश्चिम-वायव्येस सुमारे 450 किमी, पोर्ट ब्लेअर (अंदमान बेटे) च्या 380 किमी पश्चिमेस, विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) च्या 970 किमी आग्नेय आणि 1030 किमीवर केंद्रीत होती. 


दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी पावसाला सुरुवात होईल. ओडिशातील गजपती, गंजम आणि पुरी या तीन जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर बुधवारसाठी जगतसिंगपूर, पुरी, खुर्दा, कटक आणि गंजाम या पाच जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. बुधवार आणि गुरुवारी पश्चिम बंगालमध्येही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मंगळवार आणि बुधवारी आंध्र प्रदेशातही जोरदार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, यापूर्वी असनी चक्रीवादळ ओडिशा किंवा आंध्र प्रदेशात धडकणार नाही परंतु किनारपट्टीला समांतर जाईल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला होता.


याआधी डिसेंबर 2021 मध्ये जावाद चक्रीवादळ भारतात आले होते. त्याचवेळी, गुलाब चक्रीवादळ सप्टेंबर 2021 मध्ये धडकले, तर मे 2021 मध्ये, यास चक्रीवादळाने बंगाल, बिहारसह अनेक राज्यांमध्ये कहर केला होता. त्यानंतर आता असनी चक्रीवादळ येणार असल्यानं नागरिकांची चिंता वाढली आहे. या चक्रीवादळाला श्रीलंकेनं असनी हे नाव दिलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: