Abhijit Ghorpade on Monsoon : सध्या देशात उन्हाचा चटका वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अशातच पावसाचे आगमन कधी होणार याबाबतचे प्रश्न देखील नागरिकांना पडत आहेत. वेगवेगळ्या संस्थांकडून मान्सून संदर्भात अंदाज वर्तवले जात आहेत. काही खासगी संस्थानी यंदा मान्सून आगमन 10 दिवस आधीच होणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, अशा कोणत्याही खासगी संस्थेने मान्सूनबाबत अंदाज व्यक्त केले असले, तरी भारतीय हवामान विभागाचा (India Meteorological Department) अंदाज काय सांगतो, याची दखल घेणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरणाचे अभ्यासक आणि भवतालचे संपादक अभिजीत घोरपडे यांनी व्यक्त केलं आहे. आतापर्यंतचा मान्सूनच्या अंदाजांचा इतिहास पाहता, भारतीय हवामान विभागाचे अंदाज इतर संस्थांच्या तुलनेत अधिक अचूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भारतीय मान्सूनचे आगमन व त्याच्यामुळे पडणारा पाऊस या जगाच्या हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटना आहेत. त्यामुळे जगभरात हवामानतज्ञ, संशोधन संस्था त्याचा मागोवा घेतात, अंदाज वर्तवण्यासाठी प्रयत्न करतात. भारतातही काही खासगी संस्था त्याबाबतचे अंदाज वर्तवतात. भारतीय हवामान विभागाकडून याबाबत अधिकृत अंदाज जाहीर केले जातात. खासगी संस्था किंवा अधिकृत संस्था या सर्वांचेच अंदाज काही प्रमाणात चुकतात. मात्र, कोणत्याही खासगी संस्थेने मान्सूनबाबत अंदाज व्यक्त केले असले, तरी भारतीय हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो, याची दखल घेणे आवश्यक असल्याचे घोरपडे यांनी एबीपी डीजिटलशी बोलताना सांगितले.
खासगी संस्था लोकांना उत्तरदायी नसतात
हवामानाचा अंदाज कोणीही देऊ शकतो. मात्र, खासगी संस्था लोकांना उत्तरदायी नसतात. अधिकृत हवामान विभाग काही प्रमाणात का होईना सरकारला आणि लोकांना उत्तरदायी असतो. शिवाय आतापर्यंतचा अंदाजांचा इतिहास पाहता, भारतीय हवामान विभागाचे अंदाज इतर संस्थांच्या तुलनेत अधिक अचूक असल्याचे आढळते. त्यामुळे इतर संस्थांचे अंदाजांची दखल घ्यायला हरकत नाही, मात्र भारतीय हवामान विभागाला टाळून तसे करणे योग्य होणार नसल्याचे घोरपडे यांनी सांगितले.
दरम्यान, दरवर्षी आयएमडीकडून मान्सून अंदाज जाहीर केला जातो. आयएमडीचा 85 टक्के अंदाज हा बरोबर येतो. तर स्कायमेटचा अंदाज 40 टक्क्यांच्या आसपास बरोबर येतो असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे आयएमडीच्या अंदाजावरच विश्वास ठेवावा असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Monsoon News : मान्सून संदर्भातील बातम्यांसाठी IMD चे अंदाज अधिक विश्वासार्ह, पाहा काय म्हणतायेत तज्ज्ञ
- Osmanabad Crop Insurance : शेतकऱ्यांच्या लढ्याला यश, उस्मानाबाद जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांचा खरीप-2020 चा पीक विमा मंजूर