(Source: ECI/ABP News/ABP Majha)
COVID-19 Vaccination: देशभरात लसीकरणाने 20 कोटींचा टप्पा ओलांडला, कोणत्या वयोगटाला सर्वाधिक डोस?
देशभरात लसीकरणाने 20 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत भारताने सुमारे 15.7 कोटी लोकांना लसीचे 20 कोटींहून अधिक डोस दिले आहेत.
नवी दिल्ली : कोरोना संसर्गाविरोधात लढण्यासाठी देशभरात राबविण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेने महत्त्वचा टप्पा गाठला आहे. देशभरात लसीकरणाचे आकडा 20 कोटीच्या पुढे गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत भारताने सुमारे 15.7 कोटी लोकांना 20 कोटीपेक्षा जास्त लसीचे डोस दिले आहेत. त्यापैकी 11.3 कोटी लोकांना फक्त पहिला डोस मिळाला आहे, तर 4.35 कोटी लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सुमारे 20 कोटी डोसपैकी 20 टक्के लस आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. 18-44 वयोगटातील 6.4 टक्के आणि उर्वरित 73.6 टक्के डोस 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना देण्यात आले आहेत.
60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 7.5 कोटी डोस
60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना एकूण 7.5 कोटी (5.7 कोटी लोकांना पहिला तर 1.8 कोटी लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे) तर 45 ते 60 वर्षांदरम्यानच्या 7.2 कोटी लोकांना कोरोना लस देण्यात आली. यात 6.2 कोटींना पहिला डोस दिला गेला आणि 1 कोटींना दोन्ही डोस देण्यात आले.
18 ते 44 वयोगटातील लोकांना 1.2 कोटी डोस
या वयोगटातील देशातील आघाडीच्या कामगारांना 2.3 कोटी डोस (1.5 कोटी लोकांना पहिला डोस तर 84 लाख लोकांना दुसरा डोस दिलाय) आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना 1.6 कोटी डोस देण्यात आले, त्यापैकी 98 लाख लोकांना पहिला तर 67 लाख लोकांना दुसरा डोस देण्यात आला. आकडेवारीनुसार, 18 ते 44 वयोगटातील लोकांना 1.2 कोटी डोस मिळाले आहेत, जे सर्वांसाठी पहिला डोस होते.