बेळगाव : राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मराठी भाषिक तरुणांना अखेर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. धारवाड येथील कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके,अंकुश केसरकर यांना जामीन मंजूर केला असून ॲड.अमर येळूरकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.याशिवाय बेळगाव येथील आठव्या अतिरिक्त जिल्हा सत्र  न्यायालयाने राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ३८ जणांना जामीन मंजूर केला आहे अशी माहिती ॲड.महेश बिर्जे यांनी दिली.


बंगळुरु येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्या नंतर बेळगावात त्याचे पडसाद उमटले होते.धर्मवीर संभाजी चौकात तरुणांनी जमून पुतळ्याची विटंबना केलेल्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती.त्यावेळी काही समाजकंटकांनी सरकारी वाहनांची मोडतोड करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले होते.पोलिसांनी याबाबत मराठी भाषिक तरुणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केले होता.नंतर अटक केलेल्या तरुणांची हिंडलगा कारागृहात रवानगी केली होती.


गेल्या महिनाभरापासून अटकेत असणाऱ्या निष्पाप मराठी तरुणांना  सोडविण्यासाठी वकिलांनी केलेले शर्थीचे प्रयत्न फळास आले आहेत. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून दोन दिवसात शुभम शेळके आणि अंकुश केसरकर यांची कारागृहातून सुटका  होणार आहे.उर्वरित अटकेत असणाऱ्या मराठी बांधवांची सुटका सुद्धा पुढील आठवड्यात होणार आहे . 


काय आहेत अटी


एक  लाख रूपयाचे दोन जामीन व तितक्याच रकमेचे हमीपत्र, साक्षीदाराना धमकावू नये, पुन्हा असा गुन्हा करू नये, तसेच कोणत्याच विजय यात्रेत सामील होऊ नये, प्रत्येक तारखेला हजर राहावे अशा अटीवर जामीन मंजूर झाला आहे.


मराठी भाषिक तरुणांच्या वतीने अॅड. महेश बिर्जे  व  ॲड. एम.बी.बोन्द्रे यांनी न्यायालयात बाजू मांडली.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



इतर महत्त्वाच्या बातम्या :