Corona Vaccine : रशियन 'Sputnik 5' लसीला भारतात लवकरच परवानगी मिळण्याची शक्यता
जगभरात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. अशातच भारतात आणखी एका लसीला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. रशियाच्या स्पुतनिक-5 लसीला पुढच्या काही आठवड्यांमध्ये भारतीय औषध नियामकांकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
हैदराबाद : संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकलं आहे. अशातच अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच जगभरात कोरोना लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. भारतातही लसीकरणाला सुरुवात झाली आहे. अशातच आणखी एका लसीला मंजुरी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. औषध निर्मिती क्षेत्रातील कंपनी डॉ. रेड्डीज लेबोरेटरीजने शक्यता वर्तवली आहे की, रशियाच्या स्पुतनिक-5 ला पुढच्या काही आठवड्यांमध्ये भारतीय औषध नियामकांकडून मान्यता मिळू शकते. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली.
पुढील काही आठवड्यांत मंजुरी मिळण्याची शक्यता : सीईओ
कंपनीचे सीईओ, एपीआय आणि सर्विसेज, दीपक सापरा यांनी बोलताना सांगितलं की, "आम्हाला पुढील काही आठवड्यांमध्ये मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. नागरिकांना या लसीचे दोन डोस घ्यावे लागतील. पहिला डोस घेतल्यानंतर 21 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागेल. लस घेतल्यानंतर 28 आणि 42 दिवसांमध्ये शरीरात रोगप्रतिकारक शक्ती विकसित होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे लसीचे दोन डोस घेणं आवश्यक असणार आहे. आम्हाला पुढच्या काही दिवसांत लसीला मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आहे."
सापरा रविवारी संध्याकाळी आयोजित एका वेबिनारमध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांना 'स्पुतनिक-5' लस भारतात कधी उपलब्ध होणार यासंदर्भात विचारण्यात आलं. त्यावेळी ते म्हणाले की, "डॉ. रेड्डीजने स्पुतनिक-5 लस भारतामध्ये आणण्यासाठी 'रशिया डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड' यांच्यासोबत करार केला आहे.
देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; एकूण बाधितांपैकी 84 टक्के रुग्ण 8 राज्यांत
महाराष्ट्र, कर्नाटक आणि पंजाब या राज्यांसह आठ राज्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. एका दिवसात समोर आलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीत 68 हजार 020 रुग्णांपैकी 84.5 टक्के रुग्ण या राज्यांमधील आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. मंत्रालयाने सांगितलं की, भारतात 6 कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. गेल्या एका दिवसांत महाराष्ट्रात 40 हजार 414 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त कर्नाटकात 3 हजार 082, पंजाबमध्ये 2 हजार 870, मध्य प्रदेशात 2 हजार 276, केरळमध्ये 2 हजार 216, तामिळनाडूमध्ये 2 हजार 194 आणि छत्तीसगढमध्ये 2 हजार 153 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, देशात गेल्या एका दिवसात समोर आलेल्या 68 हजार 020 कोरोना बाधितांपैकी 84.5 टक्के रुग्ण हे कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या आठ राज्यांमधील आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Coronavirus : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; एकूण बाधितांपैकी 84 टक्के रुग्ण 'या' 8 राज्यांत
- Pune Corona Update : कोरोनाच्या प्रादुर्भावात बेडसाठी रुग्णांची ससेहोलपट; खाजगी रुग्णालयांच्या हेकेखोरपणापुढं प्रशासन हतबल
- Maharashtra Corona Update | आज राज्यात 'इतक्या' कोरोनाबाधितांची वाढ; बरं होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्या बाधितांचा आकडा जास्तच