नाशिक : चीनमध्ये पुन्हा कोरोनाने (Coronavirus) डोकं वर काढल्याने कोरोना हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला असतांनाच एक चिंताजनक बाब समोर आलीय. NCRB च्या रिपोर्टनुसार कोरोना काळात म्हणजे 2021 साली भारतात तब्बल एक लाख 64 हजार नागरिकांनी आत्महत्या (Suicide)  केली आहे. तर मानसोपचार तज्ज्ञांच्या मते गेल्या दोन वर्षात नैराश्याच्या प्रमाणात 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी सरकारने काहीतरी तात्काळ उपाययोजना राबवणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले आहे.


चीनमध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघता भारतात देखील आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय. भारतात गेली दोन वर्ष  कोरोनाचे जवळपास सर्वच क्षेत्रावर विपरीत परिणाम झाले होते तर अनेकांवर आर्थिक संकट कोसळल्याने नागरिक आजही टोकाचे पाऊल उचलत असल्याच्या घटना समोर येत आहेत. नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या गौरव जगताप आणि नेहा जगताप या दाम्पत्याने दोनच दिवसांपूर्वी आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याने हा चर्चेचा विषय ठरला होता. या दोघांनी आपले जीवन का संपवले ? याचा तपास पोलीस करत असतांनाच कोरोना काळात खासगी नोकरी गेल्याने गौरव हा आर्थिक संकटात सापडला होता त्यामुळे काही जणांकडून घेतलेले कर्जाचे पैसे हे दाम्पत्य फेडू शकत नव्हता. कर्जाच्या पैशांसाठी संशयितांकडून तगादा लावला जात असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलय.


दिवसेंदिवस वाढत जाणारे आत्महत्यांचे प्रमाण हे चिंताजनक आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या अकरा महिन्यातच 345 जणांनी आपले जीवन संपवले आहे. तर NCRB रिपोर्टमध्ये समोर आलेली आकडेवारी ही धक्कादायक असून कोरोनाकाळात 2021 साली भारतात तब्बल 1 लाख 64 हजार लोकांनी आत्महत्या केली आहे.  आर्थिक ताणतणाव, आजार, कौटुंबिक वाद ही काही यामागील कारणे आहेत. तर मानसोपचार तज्ज्ञांच्या मते मागच्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे नागरिकांमध्ये नैराश्याचे प्रमाण हे 25 टक्क्यांनी वाढले आहे. यात विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे 15 ते 30 वयोगटातील मुला मुलींची संख्या आत्महत्या करण्यात अधिक आहे.  


कोरोना काळात ताणतणाव वाढला, आजारपणावर पैसे मोठ्या प्रमाणावर खर्च झाले, आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली, अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या आणि यामुळे नागरिकांमध्ये नैराश्य वाढले. आत्महत्यांचे हे प्रमाण रोखण्यासाठी सरकारने काहीतरी तातडीने पाऊलं उचलून जनजागृती करणं गरजेचं आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये तरुणाईकडे विशेष लक्ष दिले गेले पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सदस्यांचा दुरावलेला कौटुंबिक संवाद हा वाढवला पाहिजे.  


 आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलणं हा कुठलाही पर्याय कशावर होऊ शकत नाही. आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या कुटुंबाचा जरा विचार करा, वेळ पडल्यास डॉक्तरांचा सल्ला घ्या. तुमचे मित्र मंडळी, नातेवाईक यांच्याशी संवाद साधा तुमच्या अडचणी सांगा असाच सल्ला डॉक्टरांकडून दिला जातोय.