मुंबई: विज्ञान क्षेत्रातल्या सर्वात महत्त्वाच्या शोधांपैकी एक म्हणजे रेडिअमचा शोध. 21 डिसेंबर 1898 रोजी त्याचा शोध लागला. नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञा मेरी क्युरी आणि तिचे पती पिएर क्युरी यांनी रेडिअयमचा शोध लावला. रेडिअमचा शोध हा क्रांतीकारी शोध होता. तसेच प्रसिद्ध अभिनेता गोविंदाचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता. यासह आज इतिहासात घडलेल्या इतर महत्त्वाच्या घडामोडी पाहू.


1898- रेडिअमचा शोध


प्रसिद्ध शास्त्रज्ञा मेरी क्युरी (Marie Curie) आणि पिएरी क्युरी यांनी आजच्याच दिवशी, 21 डिसेंबर 1898 रोजी रेडिअमचा (Radium) शोध लावला. मेरी आणि पिएर क्युरी या दोघांनी पिचब्लेंडसारखी खनिजे युरेनियमपेक्षाही जास्त प्रमाणात बेक्वेरल किरण उत्सर्जित करतात हे दाखवून दिले. मेरीने पिचब्लेंडमधून मोठ्या प्रमाणात किरणोत्सार करणारा पदार्थ वेगळा करून एका नवीन मूलद्रव्याची भर घातली. या नवीन मूलद्रव्यास मेरीने आपल्या पोलंड देशावरून पोलोनियम असे नाव दिले. पुढे मेरी आाणि पिएर क्युरी यांना पोलोनियमपेक्षाही जास्त किरणोत्सारी रेडियम नावाचे मूलद्रव्य सापडले. रेडियम हे युरेनियमपेक्षा 1650 पट जास्त किरणोत्सारी आहे. एक ग्रॅम रेडियमधून दर सेकंदाला जितका किरणोत्सार बाहेर पडतो त्याला 1 क्युरी किरणोत्सार असे म्हटले जाते.


1903: उद्योजक आबासाहेब गरवारे यांचा जन्म


प्लॅस्टिक आणि नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार आबासाहेब गरवारे (Abasaheb Garware) यांचा जन्म 21 डिसेंबर 1903 रोजी झाला. त्यांच्या कार्याचा गौरव करत भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं. पुणे विद्यापीठाने त्यांना डि. लिट. पदवी दिली. 1997 साली त्यांचे निधन झाले.


1909- अनंत कान्हेरेने जॅक्सनची हत्या केली


अनंत लक्ष्मण कान्हेरेने (Anant Laxman Kanhere) नाशिकचा कलेक्ट जॅक्सनची 21 डिसेंबर 1909 रोजी हत्या केली. या घटनेमुळे ब्रिटिश सरकार चांगलेच हादरले. अनंत कान्हेरे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होता. तो विनायक दामोदर सावरकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या 'अभिनव भारत' या क्रांतिकारक संघटनेचा सदस्य होता. नाशिकचा कलेक्टर जॅक्सनची हत्या करणारा अनंत कान्हेरे हा खुदीराम बोस याच्यानंतरचा सर्वांत तरुण वयाचा भारतीय क्रांतिकारक ठरला.


1913- जगातील पहिले शब्दकोडे न्यूयॉर्क वर्ल्डमध्ये प्रकाशित 


ऑर्थर वेन यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे आजच्याच दिवशी म्हणजे 21 डिसेंबर 1913 रोजी न्यूयॉर्क वर्ल्डमध्ये प्रकाशित झालं.


1952- सैफुद्दीन किचलू यांना रशियाचा लेनिन शांतता पुरस्कार


महान स्वातंत्र्यसेनानी आणि हिंदू-मुस्लिम एकतेचे समर्थक असलेल्या सैफुद्दीन किचलू यांना 21 डिसेंबर 1952 रोजी तत्कालिन सोव्हिएत युनियनने लेनिन शांतता पुरस्काराने सन्मानित केलं. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय व्यक्ती ठरले. 


सैफुद्दीन किचलू (Saifuddin Kitchlew) हे स्वातंत्र्यसेनानी होते. मार्च 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने मंजूर केलेल्या रौलेट कायद्याचा निषेध करणाऱ्या सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांना अटक करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्त पंजाबमध्ये जालियनवाला बागेत एक निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. 13 एप्रिल 1919 रोजी या ठिकाणी ब्रिटिशांनी गोळीबार केला आणि शेकडो भारतीयांचा त्यात मृत्यू झाला. 


1963- गोविंदाचा जन्मदिन


गोविंदा अरुण आहुजा म्हणजे आपला लाडका गोविंदा (Govinda) याचा जन्म 21 डिसेंबर 1963 रोजी विरार-मुंबई या ठिकाणी झाला. भारतीय चित्रपटसृष्ठीवर गोविंदाने एक वेगळीच छाप सोडली आहे. गोविंदाने अनेक चित्रपटांमध्ये विविध पात्रे केली असून त्यापैकी त्याचू विनोदी भूमिका असलेले चित्रपट विशेष गाजले. विनोदी संवादफेकीच्या उत्कृष्ट शैलीमुळे त्याचे विनोदी चित्रपट हिट ठरले. गोविंदाने उत्तर मुंबई मतदार संघामधून लोकसभा निवडणूक लढवली आणि खासदार म्हणून प्रतिनिधीत्व केलं होतं. 


2011- पीके अयंगार यांचे निधन


प्रसिद्ध भारतीय अणुशास्त्रज्ञ पी के अयंगार म्हणजेच पद्मनाभन कृष्णगोपाल अयंगार यांचे 21 डिसेंबर 2011 रोजी निधन झाले. भारताने केलेल्या अणुचाचणीचे ते प्रमुख सूत्रधार होते. अणुउर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे.