Bikini Killer : नेपाळच्या (Nepal) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 19 वर्षांपासून नेपाळच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेला फ्रेंच सीरियल किलर चार्ल्स शोभराज (Charles Sobhraj) याच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. दोन अमेरिकन पर्यटकांची हत्या केल्याच्या आरोपाखाली चार्ल्स 2013 पासून नेपाळच्या तुरुंगात आहे.  


'बिकिनी किलर' आणि 'सिरियल किलर' अशी ओळख
बुधवारी नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने कुख्यात सीरियल किलर चार्ल्स शोभराजच्या सुटकेचे आदेश दिले. यासोबतच त्याला 15 दिवसांच्या आत त्याच्या देशात पाठवण्यात यावे, असेही सांगण्यात आले आहे. गुन्हेगारीच्या जगात 'बिकिनी किलर' आणि 'सिरियल किलर' अशी ओळख असलेल्या शोभराजवर भारत, थायलंड, तुर्की आणि इराणमध्ये 20 हून अधिक लोकांची हत्या केल्याचा आरोप आहे. बुधवारी न्यायमूर्ती सपना प्रधान मल्ला आणि तिल प्रसाद श्रेष्ठ यांच्या संयुक्त खंडपीठाने शोभराजच्या सुटकेचे आदेश दिले. नेपाळ सुप्रीम कोर्टानं आदेशात म्हटलं आहे की, शोभराजनं आधीच 75 टक्के शिक्षा भोगली आहे आणि त्यांचे वर्तन वाईट नाही, त्याला घटनेनुसार वृद्धापकाळाचा लाभ देण्यात यावा. त्याला तात्काळ तुरुंगातून मुक्त करून 15  दिवसांत त्याच्या मायदेशी पाठवावे, असेही आदेशात म्हटले आहे.


2003 मध्ये करण्यात आली होती अटक 


1 सप्टेंबर 2003 रोजी एका वृत्तपत्रात त्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर, शोभराज नेपाळमधील एका कॅसिनोबाहेर दिसल्याचे कळले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध 1975 मध्ये काठमांडू आणि भक्तपूर येथे दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी दोन स्वतंत्र खुनाचे गुन्हे दाखल केले. तो काठमांडूच्या मध्यवर्ती कारागृहात 21 वर्षे शिक्षा भोगत होता. अमेरिकन नागरिकाच्या हत्येप्रकरणी त्याला 20 वर्षे आणि बनावट पासपोर्ट वापरल्याबद्दल एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती


कोण आहे चार्ल्स शोभराज?


चार्ल्स शोभराज याचा जन्म व्हिएतनाममध्ये झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने आग्नेय आशियातील जवळपास सर्वच देशांतील लोकांना विशेषत: मुलींना आपले बळी बनवले. चार्ल्स शोभराज हा चोरी आणि फसवणूक करण्यात अत्यंत हुशार आहे. तिला 'बिकिनी किलर' म्हणूनही ओळखले जात होते. शोभराजने दक्षिण आणि आग्नेय आशियातील किमान 20 पर्यटकांना ठार मारले आहे, तसेच यामध्ये 14 थायलंडमधील पर्यटकांचा समावेश आहे. 1976 ते 1997 या काळात त्याला भारतातील तुरुंगात ठेवण्यात आले होते. मुलींशी मैत्री केल्यानंतर चार्ल्स त्यांना अंमली पदार्थ द्यायचा आणि त्यांची हत्या करत असे. परदेशी स्त्रिया त्याचा मुख्य बळी असायच्या. तो एवढा धूर्त होता आणि इतक्या चलाखीने गुन्हे करत असे की, त्याचा सुगावा लागण्याआधीच तो गुन्ह्यातून पसार व्हायचा. 


तिहार तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी


1976 मध्ये चार्ल्सने भारत भेटीसाठी आलेल्या एका फ्रेंच ग्रुपची हत्या केली. या प्रकरणात, चार्ल्सला इस्रायली पर्यटकाच्या हत्येसाठी सात वर्षांची शिक्षा झाली. यानंतर 1986 मध्ये तो आपल्या साथीदारांसह तिहार तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र तो पुन्हा पकडला गेल्यावर शिक्षा पूर्ण करून तो फ्रान्सला गेला. त्यानंतर नेपाळ दौऱ्यावर असताना त्याला पुन्हा अटक झाली आणि जन्मठेपेची शिक्षा झाली.


तुरुंगात केले लग्न 


नेपाळमध्ये शिक्षा भोगत असताना चार्ल्सने निहिता बिस्वास या नेपाळी मुलीशी लग्न केले. लग्नाच्या वेळी निहिता 20 वर्षांची होती. तर चार्ल्स 64 वर्षाचा होता.