नवी दिल्ली : सध्याच्या घडीला संपूर्ण जग कोरोना व्हायरस या महामारीविरोधात लढत आहे. या व्हायरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश आपापल्या परीने हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन भारताने अमेरिकेसह शेजारील देशांना हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाच्या निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने मलेरियाच्या या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मलेरियाच्या उपचारांमध्ये वापरलं जाणारं हायड्रॉक्सिक्लोरोक्वी हे औषध कोरोनाच्या उपचारांसाठीही वापरलं जात असून त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे.


पराराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी या संदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. यात म्हटलं आहे की, कोरोना व्हायरसच्या महामारीच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. भारत आपल्या सर्व शेजारी देशांना (जे आमच्या क्षमतेवर अवलंबून आहेत) योग्य प्रमाणात पॅरासेटीमॉल आणि हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा परवाना देणार. कोरोना व्हायरसचा मोठा फटका बसलेल्या देशांमध्ये आम्ही ही औषधं निर्यात करणार आहोत. COVID-19 चा परिणाम पाहता संपूर्ण जगाने एकीने आणि सहकार्याने या व्हायरसा सामना करायला हवा, असं आम्ही कायमच बोलत आलेले आहोत.


हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध न दिल्यास प्रत्युत्तर दिलं जाईल, डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी


डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
याआधी भारताने हायड्रॉक्सॉक्लोरेक्वीन औषधाच्या निर्यातीला परवानगी द्यावी, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. ट्रम्प म्हणाले होते की, "मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे, जेणेकरुन भारत अमेरिकेत हायड्रॉक्सिक्लोरेक्वीनच्या विक्रीला परवानगी द्यावी. त्याच्या काही तासआधीच भारताने मलेरियाच्या या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. भारत अनेक वर्षांपासून अमेरिकन व्यापार नियामांचा लाभ घेत आहे. अशात जर हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनची निर्यात रोखली तर नक्कीच आश्चर्य वाटेल."


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरुन बातचीत झाली. हे औषध अमेरिकेला देण्यासंदर्भात विचार करु, असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. त्याबाबत ट्रम्प म्हणाले की, "रविवारी सकाळी आमच्यात बातचीत झाली होती. तुम्ही आम्हाला औषध दिलं तर निश्चितच या निर्णयाचं कौतुक करु. मात्र हे औषध अमेरिकेला देण्यासाठी परवानगी दिली नाही तर ठीक आहे, परंतु निश्चितच याला प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं आणि असं का होऊ नये?"


औषधांवरील निर्यातबंदी हटवली
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, "आवश्यक औषधांचा देशात योग्य प्रमाणात साठा असावा हे आमचं प्राधान्य आहे. त्यामुळे काही औषधांच्या निर्यातीवर काही दिवसांपूर्वी बंदी घालण्यात आली होती. पण आताची परिस्थिती पाहता सरकारने काही औषधांवरील निर्यातबंदी हटवली आहे. पॅरासिटेमॉल आणि हायड्रोक्लोरोक्वीनबाबत सातत्याने आढावा घेतला जात आहे. एकदा का भारतात या औषधांचा मुबलक साठा तयार झाला त्यानंतर कंपन्यांकडून आधारावर निर्णय घेतला जाईल."


World Corona Update | जगभरात साडे 13 लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त; अमेरिका, स्पेन, इटलीत कोरोनाचा कहर