पणजी: कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी गोवा सरकारकडून रविवारी मध्यरात्रीपासून सर्व शैक्षणिक संस्था, जिम, स्विमिंग पूल, सिनेमा थिएटर, कॅसिनो इत्यादी 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही माहिती मुख्यमंत्री प्रमोद प्रमोद सावंत यांनी दिली आहे.


कोरोनावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या सरकारी निवासस्थानी उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, मुख्य सचिव परिमल राय, आरोग्य सचिव नीला मोहनन यांच्या बरोबरच शिक्षण, गोवा विद्यापीठ, गोवा मेडिकल कॉलेज, रेल्वे, मुरगाव पोर्ट ट्रस्ट, पर्यटक खात्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकी नंतर माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारतर्फे सर्व खबरदारी घेतली जात आहे. विमानतळ, मुरगाव पोर्ट ट्रस्ट आणि रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तपासणी करण्यासाठी थर्मल स्कॅनर बसवले जाणार आहेत. त्यांची खरेदी त्वरित केली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

सर्व शैक्षणिक संस्था 31 मार्च पर्यंत बंद ठेवल्या जाणार असल्या तरी दहावी, बारावीसह इतर इयत्ताच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार आहेत. जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी सॅनिटायझर तसेच कर्मचाऱ्यांना मास्क पुरवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. शिमगोत्सव आयोजनाबाबतचा निर्णय घेण्याची स्थानिक समित्यांना मुभा राहिल असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोरोना संदर्भात लवकरच मार्गदर्शक तत्वे जाहीर केली जाणार असून बंद दाराआड होणारे, गर्दी जमेल असे कार्यक्रम शक्यतो आयोजित करू नये असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुणी मास्क आणि सॅनिटायझर यांचा काळाबाजार करू नये असे स्पष्ट करत 31 मार्च रोजी पुन्हा एकदा आढावा बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल,असे मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोनाचे देशात दोन बळी

भारतात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. काल दिल्लीतील 68 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. अहमदनगरमध्ये एका रूग्णाला कोरोनाची लागण झाली आहे, तर मुंबईतही आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत आता 4, पुण्यात 10, नागपुरात 3 तर ठाण्यात एकाला कोरोनाची लागण झाली आहे. आता राज्यात एकूण 19 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.

Coronavirus | कोरोना व्हायरसचा देशातला दुसरा बळी, दिल्लीत 68 वर्षीय महिलेचा मृत्यू

महाराष्ट्रात 133 संशयित रुग्ण भरती 

महाराष्ट्रात सध्या 133 संशयित रुग्ण भरती झाले असून 13 मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 1 हजार 390 विमानांमधील 1 लाख 60 हजार 175 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. 18 जानेवारीपासून राज्यात सध्या वेगवेगळ्या विलगीकरण कक्षामध्ये एकूण 532 जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी 441 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहे. त्यातील 17 जण पॉझिटिव्ह आहेत. सध्या पुणे येथे 18 जण, मुंबई येथे 35, नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 18 जण, यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 9 जण तर पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात 3 संशयित रुग्ण भरती करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत बाधित भागातून 818 प्रवासी आले आहेत.


संंबंधित बातम्या : 


#CoronaVirus | कोरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळणार, शनिवारीच अधिवेशनाचा समारोप

Coronavirus | पुण्यानंतर मुंबईत कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण


Corona Virus | असंवेदनशीलतेचा कळस, कोरोना पीडित रुग्णाच्या कुटुंबाला वाळीत टाकलं


#CoronaVirus | महाराष्ट्रातील 11 रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे नाहीत, अधिकची काळजी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे